नाशिक – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आले आहेत. त्यांचे पुत्र आणि मनसेचे कार्याध्यक्ष अमित ठाकरे हे कालच नाशकात दाखल झाले आहेत. आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन बळकट करण्यासाठी ठाकरे यांचा दौरा महत्त्वाचा आहे. नाशिक महापालिकेत यापूर्वी मनसेने सत्ता स्थापन केली होती. मात्र, त्यानंतर मतदारांनी मनसेकडे पाठ फिरविली. आता पुन्हा सत्ता मिळावी यासाठी राज आग्रही आहेत. त्यासाठी पक्ष संघटनेत अमुलाग्र बदल करण्याच्या पवित्र्यात ठाकरे आहेत. त्यामुळेच मनसेच्या सर्व शाखा प्रमुख आणि विभागाच्या पदाधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका सध्या सुरू आहेत.
कुठल्याही परिस्थितीत आता सत्ता मिळावी याचा कयास मनसेच्यावतीने बांधण्यात आला आहे. नाशिक मनपामध्ये सध्या भाजपची सत्ता आहे. नाशिककर विविध समस्यांनी ग्रासले आहे. मनसेच्या सत्ता काळात विविध विकासकामे झाली होती. मात्र, ती टिकविण्यात आणि वाढविण्यात सत्ताधाऱ्यांना यश आलेले नाही हा मुद्दा मनसेद्वारे जोरकसपणे मांडला जाणार आहे.
तसेच, प्रथमच अमित यांना नाशिक मनपा निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांची आगामी राजकीय कारकीर्द उज्ज्वल होण्यासाठी ही बाब महत्त्वाची आहे. त्यामुळेही राज हे नाशिक मनपा निवडणूक प्रतिष्ठेची करु शकतात आणि त्यादृष्टीनेच आता संपूर्ण व्यूहरचना राहणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. पक्ष संघटनेतील संपूर्ण फेरबदल, नव्या दमाच्या आणि चेहऱ्याच्या व्यक्तींना संधी हा त्याचाच एक भाग आहे. म्हणूनच राज ठाकरे यांचा हा सर्जिकल स्ट्राईक नेमका कसा असेल याची पक्ष पदाधिकाऱ्यांसह अनेकांना उत्सुकता आहे.