मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोरेगाव येथे ‘मुंबई महानगर प्रदेश मतदार यादी प्रमुख मेळाव्याला’ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगासह सत्ताधाऱ्यांवरही आसूड ओढले. ‘जोपर्यंत मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही, सर्व राजकीय पक्षांचं समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रात निवडणुका घेऊनच दाखवा’ असे खुले आव्हानही त्यांनी यावेळी दिले.
राज ठाकरे यांच्या संबोधनातील प्रमुख मुद्दे असे…
यावेळी जेव्हा आपण ठरवू तेव्हा निवडणूक लागेल.
२०१७ साली वोटिंग मशीन आणि मतदार याद्यांसंदर्भात मी पत्रकार परिषद घेतली होती. पण त्यावेळी अनेकांना त्याचं गांभीर्य समजलं न्हवतं.
पुढे होणाऱ्या निवडणुकांसाठी जवळपास ९६ लाख खोटे मतदार यादीमध्ये भरले आहेत.
अशा निवडणुका जर आपल्या देशात होणार असतील तर कशासाठी निवडणुका लढवायच्या, पैसे खर्च करायचे आणि मतदान करायचं?
आम्ही जर निवडणूक आयोगाला मतदार याद्या सुधारायला सांगतोय मग, सत्ताधारी यावर का उत्तरं देतायेत?
नरेंद मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर आरोप केले होते ते आम्ही आज सांगतोय यात चूक काय?
सत्ताधारी पक्षाचे आमदार विलास भुमरे जाहीर भाषणात सांगतात मी २० हजार मतदान बाहेरून आणलं, इतकी यांची हिंमत कशी होते?
सत्ताधारी पक्षातील अनेक आमदारांनीही मतदार यादीबाबत संशय व्यक्त केला आहे. मग यावर आम्ही बोललो तर चूक काय?
महाराष्ट्रातील प्रमुख शहरं अदानी, अंबानीला आंदण देण्यासाठी हे सगळं सुरू आहे.
ज्यावेळी गुजरातचा वरवंटा या महाराष्ट्रावर फिरेल त्यावेळी भाजपला मतदान करणारा मराठी माणूसही त्यात भरडला जाईल.
मुंबई आणि महाराष्ट्रात मराठी माणसाच्या थडग्यावर उभं राहून विकास होणार असेल तर मी खपवून घेणार नाही.
माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येक मतदाराला माझी विनंती आहे, सतर्क राहा. आमची माणसं ज्यावेळी तुमच्याकडे येतील तेव्हा त्यांना सहकार्य करा.
जोपर्यंत मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही, सर्व राजकीय पक्षांचं समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रात निवडणुका घेऊनच दाखवा.
महाराष्ट्रातील निवडणुका शांतपणे पार पाडायच्या असतील तर पहिले मतदार यादी स्वच्छ करा, जो खरा मतदार आहे त्याला मतदान करू देत.
सत्तेवर कोण येईल याच्याशी मला कर्तव्य नाही. पण जे मतदान होईल ते खरं होईल या दृष्टिकोनातून निवडणुका झाल्या पाहिजेत.
तुम्ही मतदान करा किंवा करू नका, मॅच फिक्सिंग झालेलं आहे. अशा प्रकारच्या निवडणुका हा मतदारांचा अपमान आहे.