इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी भेट घेतली. त्यानंतर या भेटीमागील कारण त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले.
अमित ठाकरे म्हणाले की, सत्तावीस तारखेला आपला गणेशोत्सव सुरू होतोय आणि माझ्या माहितीप्रमाणे, ह्या पावसाळी अधिवेशनात आशिष शेलार यांनी गणेशोत्सवाला “राज्य महोत्सवाचा” दर्जा दिल्याचं घोषित केलं. ते घोषित केल्यानंतर आमच्याकडे काही तक्रारी आल्या की, काही खाजगी कॉलेजेस किंवा शाळा आहेत तिथे गणेश उत्सवा दरम्यान परीक्षा घेतल्या जाणार आहेत, त्या शाळा कॉलेजांची यादी आमच्याकडे आहे. यामध्ये माझं म्हणणं इतकंच आहे की, राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानंतर या काळात सर्व परीक्षा रद्द कराव्यात आणि सगळ्यांनी हा सण, हा उत्सव आनंदात साजरा करावा. हा सगळ्यांचा उत्सव असल्याने सगळ्यांनी तो आनंदात साजरा केला पाहिजे. आपले बरेचसे लोक कोकणातून येतात. तिकडे गणेश उत्सव हा प्रमुख उत्सवांपैकी एक आहे, त्यांना गावी जायचं असतं. जर या काळात परीक्षा ठेवल्या तर आई वडील गावी गेले आणि इकडे मुलगा किंवा मुलगी परीक्षेसाठी थांबले तर कुठेतरी तणावाचं वातावरण निर्माण होतं, म्हणून या काळात सर्व परीक्षा रद्द व्हायला हव्या.
या मागणीसाठी सर्व मंत्र्यांकडे जाण्यापेक्षा हे ज्यांनी घोषित केलं, त्या कल्चरल मिनिस्टर महोदयांनी एक परिपत्रक काढून सर्वांना सुचित केलं तर बरं होईल, केवळ यासाठीच मी त्यांची भेट घेतली. महाराष्ट्रात जे सर्व बोर्ड आहेत त्या सगळ्यांना हा गणेशोत्सव साजरा करता आला पाहिजे. या काळात त्यांच्या परीक्षा तर नकोच पण त्यांना सुट्टी पण मिळाली पाहिजे एवढीच आमची मागणी आहे.
आशिष शेलार आणि राज साहेब यांचे जुने मैत्रीचे संबंध आहेत. जेव्हा कधी कोणावर टीका होतात, तेव्हा त्या राजकीय असतात, वैयक्तिक कधीच नसतात. टिका या झाल्याच पाहिजेत, सरकारचं कधी काय चुकत असेल तर टीका होणारच, त्यामुळे वैयक्तिक दुरावा कधीही होत नाही.
गेले चार पाच दिवस मुंबईत जो पाऊस पडला त्या पावसाने मुंबईकरांचे खूपच हाल बेहाल झाले. अडीच हजार खड्डे हे अवघ्या पाच दिवसांमध्ये मुंबईच्या रस्त्यांना पडलेले आहेत. याबाबत मी अनेक वर्ष बोलतोय, ह्याचं एकच उत्तर आहे ते म्हणजे “राज ठाकरे”. किती सरकार आले आणि गेले, किती वर्ष बघतोय आपण, किती पाणी साचतंय ते. यासाठी पुन्हा सांगतो एकदा संधी द्या, नाशिक मध्ये दिली तशी. तुम्हाला कळलं काय झालं तिथे, तर मग इथे सुद्धा चांगलच होईल.