मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत गोरेगाव येथे होत असलेल्या शिवजयंती काक्रमावेळी अचानक स्टेज कोसळल्याची घटना घडली आहे. याच स्टेजवरुन राज ठाकरे भाषण देणार होते. या दुर्घटनेत कुणालाही फारशी दुखापत झाली नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, हा स्टेज कोसळल्यामुळे एकच खळबळ उडाली.
गोरेगाव येथे मनसेच्या शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम होता. याच कार्यक्रमात शिवजयंती सोहळाही साजरा केला जाणार होता. या कार्यक्रमासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अन्य पदाधिकारी व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी मनसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, त्याचवेळी अचानक हे स्टेज कोसळले. या दुर्घटनेत राज यांच्यासह पदाधिकारी सुखरुप असल्याचे सांगितले जात आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्यावतीने जोरदार तयारी केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून ठिकठिकाणी शाखा उदघाटनाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून गोरेगाव येथील हा एक कार्यक्रम होता.