नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगांवकर शनिवार २ जुलै रोजी ‘राजगड’ कार्यालयाच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त नाशिक येथे सायंकाळी ५ ते ९ दरम्यान ‘राजगड’ कार्यालय येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील सर्व नवीन व जुने पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांबरोबर संवाद साधणार आहेत. त्या निमित्त आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर कार्यकारिणीतील सर्व प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक, शहर समन्वयक, शहरातील उपजिल्हाध्यक्ष, शहर उपाध्यक्ष, सरचिटणीस, सर्व अंगीकृत संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, सर्व इच्छुक उमेदवारांची अति महत्वाची व तातडीची बैठक राजगड येथे संपन्न झाली. राज्यातील सत्तानाट्यानंतर स्थापन होत असलेल्या नवीन सरकारच्या पार्श्वभूमीवर बाळा नांदगांवकर यांच्या दौऱ्यास विशेष महत्व प्राप्त झाले असून सर्व नवीन व जुने पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांबरोबर शनिवारी संवाद साधणार असल्याचे मनसेतर्फे सांगण्यात आले. या दौ-या निमित्त राजगड येथे मोठा मंडप लावण्यात आला असून पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी वेगळी व्यवस्था करण्यात येणार आहे. नांदगांवकर यांच्या दौऱ्यानिमित्त पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून आज राजगड येथे झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी नांदगांवकर साहेबांच्या दौऱ्यानिमित्त विविध सूचना केल्या अशी माहिती शहर समन्वयक सचिन भोसले यांनी दिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे नेते बाळा नांदगांवकर, मनसे नेते अनिल शिदोरे साहेब व सरचिटणीस संजय नाईक यांची नाशिकसाठी संपर्क नेते म्हणून नेमणूक केल्या नंतर नांदगांवकर यांचा हा पहिलाच नाशिक दौरा असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे असे प्रतिपादन शहर समन्वयक सचिन भोसले यांनी केले.