मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची बहुचर्चित उत्तरसभा आज सायंकाळी होत आहे. गेल्या काही दिवसापासून ही सभा विशेष चर्चेत आहे. अखेर आज सायंकाळी ती होत असून राज ठाकरे काय बोलणार, काय गौप्यस्फोट करणार, कुणाला टार्गेट करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.
राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मनसे मेळाव्यात कडाडून टीका केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही मशिदींवरील भोंगे हटविले जात नाहीत. म्हणून मनसेच्यावतीने मशिदींसमोर हनुमान चालिसाचे लाऊडस्पीकर लावून पठण करण्याचे राज यांनी घोषित केले. त्यानुसार मुंबईसह काही शहरांमध्ये तसे करण्यात आले. यामुळे राज्यसह देशभरातच राज ठाकरे पुन्हा चर्चेत आले आहेत. ठाण्यातील आजच्या सभेत राज आणखी स्फोटक बोलतील का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या सभेला यापूर्वी पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यामुळे सुद्धा ही सभा चर्चेला आली. त्यानंतर आता परवानगी मिळाली आहे.
https://twitter.com/SandeepDadarMNS/status/1513370743937318917?s=20&t=ot_vhi4QhssZNoW6Txmp-Q
दरम्यान, या सभेचे टीझर मनसेच्यावतीने प्रदर्शित करण्यात आले आहे. त्यात दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज आहे. या टीझरमुळेही या सभेची मोठी चर्चा होत आहे. त्याशिवाय मनसैनिकांनी सोशल मिडियात या सभेचे अनेक पोस्टर शेअर केले आहेत. ठाण्यात ठिकठिकाणी या सभेचे बॅनर लावले असल्यामुळेही या सभेची उत्कंठा वाढली आहे. राज ठाकरे हे पुन्हा लाव रे तो व्हिडिओ करणार की आणखी काही नवी स्टाईल आणणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.