मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भोंग्याच्या वादातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना धमकीचे पत्र आले आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले की, राज ठाकरे यांना एक पत्र मिळाले असून त्यात त्यांच्या जीवाला धोका आहे. पत्र उर्दूमध्ये लिहिले आहे. ठाकरेंना काही झाले तर महाराष्ट्र पेटवू असा थेट इशारा नांदगावकर यांनी दिला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पक्षप्रमुख राज ठाकरे यांना धमकीचे पत्र आल्याचा दावा केला आहे. पत्राची भाषा उर्दूमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. नांदगावकर म्हणाले की, त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली आणि त्यांना धमकीच्या पत्राची माहिती दिली. मनसे प्रमुख राज ठाकरे यांना काही झाले तर महाराष्ट्र पेटवू असा इशारा नांदगावकर यांनी दिला आहे.
३ मे पर्यंत राज्यातील मशिदींवरील भोंगे उतरवावे, असा अल्टिमेटम राज यांनी दिला होता. ४ मे पासून मशिदींसमोर हनुमान चालिसा लावण्याचे आदेश राज यांनी मनसैनिकांना दिले होते. यावरुनच बराच गदारोळ सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे, काहींना हद्दपार करण्यात आले आहे. त्यात आता राज यांना धमकीचे पत्र आले आहे.