मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांपासून पायाच्या आजाराने त्रस्त असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. राज ठाकरे यांना शस्त्रक्रियेसाठी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यादरम्यान सर्व चाचण्या करताना त्यांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे.
पुण्यात झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी पायाच्या दुखण्याबाबत माहिती दिली होती. शस्त्रक्रिया केल्यानंतर दोन ते तीन महिने विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार ते शस्त्रक्रियेपूर्वी चोवीस तास आधी रुग्णालयात दाखल होणे आवश्यक असल्याने ते मंंगळवारी रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या आहेत. याच वैद्यकीय चाचण्यादरम्यान कोविडच्या मृत पेशींमुळे त्यांना भूल देता येणे शक्य नव्हते. त्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
लीलावती रुग्णालयाच्या आवारात मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह अनेक मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि मुलगा अमित ठाकरे हेदेखील रुग्णालयात पोहोचले होते.
दरम्यान, यापूर्वी राज ठाकरे यांनीअयोध्या दौरा जाहीर केल्यानंतर त्यांना उत्तर प्रदेशमधील भाजप खासदार बृजमोहन सिंह यांनी विरोध केला होता. उत्तर भारतीयांना मारहाण केल्या प्रकरणी राज यांनी माफी मागावी अशी मागणी सिंह यांनी केली होती. पण तत्पूर्वी शस्त्रक्रियेच्या कारणामुळे आपला आयोध्या दौरा स्थगित केला होता. दौरा अयशस्वी करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली, असा आरोप करत राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित केला होता.