ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथील उत्तर सभेत अतिशय आक्रमकपणे भाषण केले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. गुढीपाडव्याच्या सभेत त्यांनी उपस्थित केलेला मशिदींवरील भोंग्यांचा प्रश्न त्यांनी या सभेत आणखी जोरकसपणे मांडला. तसेच, त्यांनी आजच्या सभेत राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला एक अल्टीमेटमच दिला.
कुठलाही धर्म असे शिकवत नाही की अन्य धर्मियांना त्रास द्या. येत्या ३ मे रोजी रमजान ईद आहे. त्यापूर्वी महाविकास आघाडी सरकारचे गृहमंत्र्यांनी राज्यातील सर्व मौलवींना बोलवावे. त्यांच्याशी चर्चा करावी. येत्या ३ मे पर्यंत राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे उतरले पाहिजेत. मला कुठल्याही समाजात किंवा धर्मात तेढ निर्माण करायची नाबी. मशिदीवरील भोंग्यांचा प्रचंड त्रास होतो. हे भोंगे उतरवायला हवेत, अशी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. त्याचीही अंमलबजावणी होत नाही. मनसे या भूमिकेवर ठाम आहे. कदापिही यातून मागे हटणार नाही. येत्या ३ मे पर्यंत भोंगे उतरले नाही तर मशिदींसमोर हनुमान चालीसा लावणारच. आताशी फक्त मी हनुमान चालीसाच सांगितला आहे. माझ्या भात्यात आणखी बरेच बाण आहेत. ते कृपा करुन काढायला लावू नका, असा अल्टीमेटम राज यांनी आजच्या सभेत दिला आहे.
भुजबळ यांच्यावर टीका
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावरही राज ठाकरे बरसले. विविध गैरव्यवहारांमुळे भुजबळ तुरुंगात गेले. दोन ते अडीच वर्षे ते तुरुंगात राहिले. तेथून बाहेर येताच पुन्हा यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
शरद पवारांवर बरसले
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नास्तिक आहेत. ते कुठलाही देव मानत नाहीत. कधीही तुम्हाला ते देवळात गेल्याचे किंवा नमस्कार करतानाचे पहायला मिळणार नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मी स्वतः पवार यांच्याकडे कर्मचाऱ्यांना घेऊन गेलो. पण, अद्याप संप मिटला नाही. ज्या काँग्रेसमधून बाहेर पडले त्याच काँग्रेसला सोबत घेऊन पवार राजकारण करतात.