मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिवस नाशिक दौऱ्यावर असणार आहेत. आगामी नाशिक महापालिका निवडणुकीसंदर्भात त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. यापूर्वीही त्यांनी नाशिकला भेट देऊन पक्षबांधणीवर भर दिला आहे.
येत्या ६ व ७ डिसेंबर रोजी राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर असणार आहेत. त्यांच्यासोबत युवा नेते अमित ठाकरे हे सुद्धा असणार आहेत. मनसेचे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक यांच्या घरी सांत्वनपर भेट देणार आहेत. त्यानंतर ते मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत. अन्य पक्षातील काही पदाधिकारी व नेते मनसेत प्रवेश करणार असून त्याचा सोहळाही राज यांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती नाशिक शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी दिली आहे.
नाशिक महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होण्याची चिन्हे आहे. या निवडणुकीस अवघे दोनच महिने शिल्लक राहिल्याने राज यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. अन्य पक्षातील काही मातब्बर मनसेत आणणे किंवा आपल्याच पदाधिकाऱ्यांवर मदार ठेवणे हे दोन पर्याय आहेत. त्यादृष्टीने राज हे चाचपणी करणार आहेत. तसेच, निवडणुकीची रणनीतीही हे आखणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज ठाकरे यांनी पक्ष मेळावे आणि दौरे आयोजित केले होते. मात्र, त्यांना कोरोनाची बाधा झाल्याने त्यांनी हे सर्व कार्यक्रम रद्द केले होते. आता त्यांची प्रकृती उत्तम आहे. त्यामुळेच त्यांनी आता दौरे सुरू केले आहेत. लवकरच ते पुण्याचाही दौरा करणार आहेत.