मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे कोरोना बाधित झाले आहेत. त्यांच्या मातोश्री आणि बहिणीलाही कोरोनाची लागण झाली आहे. ही माहिती मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मनसेचे विविध शहरातील मेळावे स्थगित करण्यात आले आहेत. राज आणि त्यांच्या बहिणीवर लिलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याचे डॉ. जलील पारकर यांनी सांगितले आहे.
राज ठाकरे यांनी कोरोनाच्या लाटेतही मास्क वापरला नाही. तसेच, यासंदर्भात त्यांनी उघडपणे विधानही केले होते. आता मात्र, ते कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहेत. त्यांना अत्यंत सौम्य लक्षणे आहेत. त्याची तत्काळ दखल घेत त्यांच्यावर उपचार सुरू झाले आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. राज यांच्या मातोश्रींवर राहत्या घरीच उपचार सुरू आहेत. तर राज आणि त्यांची बहिण यांना लिलावती हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
कोरोनाच्या काळात राज यांनी विविध शहरांचे दौरे केले, मेळावे घेतले, विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. यावेळी त्यांनी मास्क वापरला नव्हता. त्यामुळेही ते चर्चेत होते. मनसेचा आज २३ ऑक्टोबर रोजी भांडूपमध्ये मेळावा होता. तसेच, पुणे व ठाणे येथेही मनसेचे मेळावे होते. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे मेळावे होणार होते. मात्र, राज यांना कोरोना बाधा झाल्याने हे मेळावे स्थगित करण्यात आले आहेत. या मेळाव्यांची नवी तारीख जाहीर केली जाणार आहे. दरम्यान, राज, त्यांची आई आणि बहिण या तिघांनीही कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पूर्ण केले असल्याचे सांगण्यात येत आहे.
https://twitter.com/ANI/status/1451910824998490114