मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रत्येक यशस्वी पुरुषामागे पत्नीचा हक्क असे म्हटले जाते महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बाबतीतही असेच म्हणतात. राज ठाकरे यांची सहचारिणी शर्मिला ठाकरे या स्वयंपाक घर ते राजकारणात सक्रिय आहेत. शर्मिला ठाकरे नेहमी पती यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतात. एकदा तर त्यांनी राज ठाकरेंसाठी पोलिस ठाण्याबाहेर धरणे आंदोलनही केले होते. शर्मिली ठाकरे या सामाजिक कार्यातही सक्रिय असतात.
शर्मिला ठाकरे या प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक मोहन वाघ यांच्या कन्या आहेत. राज आणि शर्मिला यांना अमित आणि उर्वशी अशी दोन मुले आहेत. शर्मिला ठाकरे नेहमी राज ठाकरे यांच्यासोबत दिसतात. राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांचे लग्न ठरण्यापुर्वी शर्मिला यांना राज यांच्या मातोश्रींनी पसंत केले. नंतर राज यांनी पसंती दिल्यानंतर दोघे लग्नाच्या बेडीत अडकले. शर्मिला राजकारणासोबत स्वयंपाकघरही यशस्वीपणे सांभाळतात. विशेष म्हणजे ठाकरे कुटूंबियांची सून होण्यापूर्वी त्यांना स्वयंपाक येत नव्हता, परंतु आपल्या सासूबाईंकडून त्या सर्व काही हळूहळू शिकल्या. या संदर्भातील एक भन्नाट किस्सा सांगण्यात येतो, तो असा की त्यांना स्वयंपाक येत नसल्याने त्या आचाऱ्याशी लग्न करणार होत्या !
शर्मिला ठाकरे यांचा राजची बहीण (ताई) ही मैत्रीण असल्यामुळे लग्नाआधी ठाकरे यांच्या घरात कायम वावर असायचा. त्यामुळे ओळख ही आधीपासूनच होती. एकदा गप्पा मारताना मला स्वयंपाकाचा कंटाळा असून मी आचाऱ्याशी लग्न करेल असे शर्मिला ठाकरे म्हणाल्याची आठवण राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे यांना सांगितली. एका कार्यक्रमात राज ठाकरे आणि त्यांच्या आई कुंदा ठाकरे यांच्याशी विविध मुद्द्यांवर दिलखुलास गप्पा रंगल्या. त्यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला…
राज ठाकरे लहान असताना कसे होते? त्यांच्या शालेय जीवनातले किस्से, कॉलेजमध्ये असताना केलेल्या करमाती, अशी सगळी गुपितं त्यांची जन्मदात्री आई, कुंदाताई ठाकरे यांनी यावेळी उलगडली. राज यांच्या आई पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आल्या आहेत राज ठाकरे आणि त्यांच्या आईसोबत त्यांच्याच घरी हा संवाद रंगला.
राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्या लग्नाचा किस्सा सांगताना राज ठाकरेंच्या मातोश्री म्हणाल्या, शर्मिलाला स्वंयपाक येत नव्हता आता हळूहळू सर्व स्वयंपाक करायला ती शिकली आहे. आता सगळ ती उत्तम सांभाळते. मला देखील लग्नाअगोदर काही करता येत नव्हते. लग्न झाल्यानंतर मी सगळा स्वयंपाक करायला शिकले.
दरम्यान, शर्मिला ठाकरे म्हणाल्या, माझी सासू गुणी आहे. आम्हाला त्यांनी सांभाळून घेतले आहे. जेव्हा माझा लग्न जमले नव्हते त्यावेळी मी त्यांना सांगितले होते. मी मॉर्डन मुलगी होती. त्यांनी मला सांभाळून घेतले आहे. मी देखील मितालीशी तसाच वागण्याचा प्रयत्न करत आहे. तर यावेळी राज ठाकरे म्हणाले की, आईने बनवलेले कोळंबीचे कालवण मला आवडते. तसेच बोंबलाची भजी देखील मला आवडते. आजही मला आईच्या बनवलेला एखादा पदार्थ खाण्याची इच्छा झाली तर आई आजही माझ्यासाठी बनवते. राज ठाकरे यांच्या आईंनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
MNS Chief Raj Thackeray Wedding Sharmila Thackeray