मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रामनवमी उत्साहात साजरी करण्याचा आदेश देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे विदेश दौऱ्यावर गेले आहेत. त्यांच्या या दौऱ्यावरून बरीच टीका होत आहे. यात उडी घेत शिवसेनेच्या (ठाकरे गट) यांनी टीका केली आहे. ‘काही लोक कार्यकर्त्यांना आदेश देतात पण स्वतः त्याचं पालन करत नाहीत. अशा लोकांना आमच्या गावाकडचे लोक उंटावरून शेळ्या हाकणारे असं म्हणतात. म्हणजेच केवळ कार्यकर्त्यांना आदेश द्यायचे आणि स्वतः मात्र त्याचं पालन करायचं नाही. अशाच काळात या लोकांचे खरे चेहरे उघडे पडतात,’ असे त्या म्हणाले आहेत.
काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी मनसेसैनिकांना रामनवमी उत्साहात साजरी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ते स्वत: अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र, तसे न होता ते कुटुंबीयांसह विदेश दौऱ्यावर गेलेत. त्यांच्या या दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सर्वांत आधी टीका केली.
‘रामनवमी साजरी करण्याचा आदेश देऊन स्वतः मात्र यामध्ये सहभागी नसणारे तथाकथित “हिंदु जननायक” परदेश दौऱ्यावर पळाले. त्यामुळे आता राम नवमी बिचाऱ्या कार्यकर्त्यांनाच साजरी करायची आहे… याला म्हणतात , “हंस चुगेगा दाना तिनका, कौआ मोती खायेगा”, असे ट्वीट त्यांनी केले होते. त्यानंतर आता सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. नेत्यांच्या अशा वागण्यातून त्यांचा खरा चेहरा पुढे येत असल्याची टीका त्यांनी केली आहे. तसेच राज ठाकरे यांचे असे वागणे म्हणजे उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रयत्न असल्याचेही त्या म्हणाल्या आहेत.
MNS Chief Raj Thackeray Ramnavami Foreign Tour Politics