पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांची कार अडविल्याने मनसैनिकांना टोल नाका अडविण्यात आला आहे. यावरुन सध्या भाजपकडून मनसेला चांगलेच लक्ष्य केले जात आहे. यासंदर्भात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रथमच प्रतिक्रीया दिली आहे. ते आज येथे माध्यमांळी बोलत होते.
राज म्हणाले की, फास्ट टॅग असूनही कार अडविली. खरं तर त्याची गरज नव्हती. अमितचा महाराष्ट्र दौरा सुरु आहे… तो प्रत्येक ठिकाणी टोल भरतो. टोलवर जी मुजोरी दाखवली गेली त्यातून हे घडलं पण भाजपने ९ वर्षांपूर्वी आश्वासन दिलं होतं कि ‘टोलमुक्त महाराष्ट्र करू’ त्याचं काय झालं ? अजूनही टोलधाड का सुरू आहे ? समृद्धी महामार्गावर अजूनही पुरेशा सुविधा का नाहीत? समृद्धी महामार्गावर भरभक्कम टोलवसुली सुरु आहे मग त्या अपुऱ्या सुविधांमुळे अपघातात जे लोक मृत्युमुखी पडत आहेत त्याची जबाबदारी भाजप किंवा सरकार घेणार आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे.
यावेळी राज यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही चांगलेच लक्ष्य केले. मुंबई-गोवा महामार्ग बांधणीला १७ वर्ष लागतात ? अजूनही ते काम अपूर्णच आहे. आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं कि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री मराठी असूनही महाराष्ट्राच्या रस्त्यांची अशी दुरावस्था झाली आहे. हे सरकारचं, मंत्र्यांचं अपयश नाही का? असा खोचक सवालही त्यांनी विचारला