मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील भाषणाचा तात्काळ इम्पॅक्ट आज (गुरुवार) बघायला मिळाला. माहीम भागातील समुद्रात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली असून त्याचे श्रेय मुंबईकर राज ठाकरे यांना देत आहेत.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांची शिवतीर्थावर जाहीर सभा झाली. नेहमीप्रमाणे राज ठाकरे काय बोलणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण त्याहून जास्त उत्सुकता होती ती भल्या मोठ्या स्क्रीनवर ते काय दाखवणार आहेत याची. या स्क्रीनवर सुरुवातीला त्यांना गीतकार जावेद अख्तर यांच्या पाकिस्तानातील मुलाखतीचा भाग दाखवला आणि सर्वांत शेवटी मुंबई पोलिसांना आव्हान देणारा व्हिडियो दाखवला. या व्हिडियोमध्ये माहीमलगतच्या समुद्रात अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचे त्यांनी दाखवले.
गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असून त्याकडे प्रशासन आणि सरकारचं कसं दुर्लक्ष होत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. सरकारने एक महिन्याच्या आत कारवाई केली नाही तर पुढे आमच्याकडे दुर्लक्ष करा, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकाम पाडण्याचे आदेश दिले आणि महानगरपालिकेकडून कारवाई देखील सुरू झाली आहे. राज यांच्या भाषणाचा हा इम्पॅक्ट सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेला आहे.
https://twitter.com/mnsadhikrut/status/1638593790129709066?s=20
रात्रीच आदेश
राज यांचे भाषण आटोपल्यावर बुधवारी रात्रीच मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते, हे विशेष. एवढच नाही तर रात्रीतूनच सहा अधिकाऱ्यांचं एक पथकही नियुक्त करण्यात आलं. त्यामुळे गुरुवारी सकाळपासूनच अतिक्रमण हटविण्याच्या कामाला सुरुवात झाली.
मोठा बंदोबस्त
सकाळी कारवाईला सुरुवात झाली तेव्हा कर्मचाऱ्यांचं आणि अधिकाऱ्यांचं पथक तिथे उपस्थित होतं. शिवाय अतिक्रमण तोडणारेही कामगार तिथे पोहोचले होते. यावेळी कुठल्याही प्रकारचा धार्मिक वाद निर्माण होऊ नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला. हा बंदोबस्त काही दिवस राहणार असल्याचे सूत्रांकडून कळते.
‘ती जागा ऐतिहासिक’
माहीम दर्गा ट्रस्टचे विश्वस्त सोहेल खंडवानी यांनी ही जागा ऐतिहासिक असल्याची प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली आहे. ‘राज ठाकरे यांनी मेळाव्यात दाखवलेली ही जागा ६०० वर्षे जुनी आहे. ती जागा ऐतिहासिक आहे. आम्ही त्या ठिकाणी दर्गा बांधणार नाही. ती जागा चिल्ला आहे, त्या ठिकाणी धार्मिक शिक्षण दिलं जात होतं.’ तसेच त्या जागेच्या आजूबाजूला अवैध बांधकाम झालं असेल तर त्यावर सरकारने नक्कीच कारवाई करावी असंही ते म्हणाले.
तर राम मंदिर बांधू
माहीमलगतच्या समुद्रात सुरू असलेले बांधकाम तातडीने पाडले नाही, तर आम्ही तिथे राम मंदिर बांधू, असा इशाराही राज यांनी भाषणातून दिला होता. एक महिन्याच्या आत कारवाई झाली नाही तर प्रशासन आणि सरकारने आमच्याकडे दुर्लक्ष करावे. आम्ही तिथे राम मंदिर बांधू, असेही राज म्हणाले होते.
https://twitter.com/kashmirashwani/status/1638778630678642689?s=20
MNS Chief Raj Thackeray Mahim Sea Illegal Construction Demolished