पनवेल (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे पक्षाच्या निर्धार मेळाव्याला संबोधित केले. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांसह सध्याच्या राजकारणावरही परखड भाष्य केले. त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे असे…
▪️ आज मी इथं मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेविरुद्धच्या आंदोलनाला झेंडा दाखवायला आलोय.
▪️ कधी कधी वाटतं चांद्रयान करून काय फायदा? चंद्रावर जाऊन खड्डेच पहायचेत तर महाराष्ट्रात पाठवायचं ना.. खड्डे इथे पण दिसले असते आणि खर्च पण वाचला असता. अहो, आपण चंद्रावर जाऊ शकतो पण महाराष्ट्रात रस्ते चांगले बंधू शकत नाही का?
▪️ २००७ ला मुंबई-गोवा हायवेचं काम सुरु झालं, त्यानंतर इतकी सरकारं आली पण रस्त्याचं काम झालंच नाही आणि तरीही त्याच लोकांना निवडून कसं दिलं जातं? रस्ते खड्ड्यात गेले काय आणि आपण खड्ड्यात गेलो काय आपल्या मतदारांना काहीच वाटत नाही?
▪️ फक्त कोकणातलेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. मुंबई ते नाशिक जायला ८ तास लागतात… लोकांचे ह्या रस्त्यानी शब्दशः हाल केलेत. काय चाललं आहे महाराष्ट्राचं?
▪️ भारतीय जनता पक्षाने मध्यतंरी सल्ला दिला की मनसेने रस्ते आणि टोल बांधायला पण शिका. त्यांना इतकंच सांगतो की, दुसऱ्यांच्या आमदारांना फोडून आणायच्या ऐवजी स्वतःचे आमदार निवडून आणायला शिका आणि पक्ष बांधायला शिका. नको ते सल्ले आम्हाला देऊ नका.
▪️ लोकांच्या डोक्यावर बंदुका ठेवायच्या आणि धाकावर लोकांना पक्षात घ्यायचं आणि त्यानंतर ती लोकं गाडीत झोपून जाणार. यानंतर “मी तुला दिसलो का? मी होतो का.” म्हणजे हा निर्लज्जपणाचा कळस नाही का?
▪️ अजित पवार म्हणे महाराष्ट्राचा विकास करायला सत्तेत गेलो. काय बोलताय ? पंतप्रधानांनी ७०,००० कोटींच्या घोटाळ्याची आठवण करून दिली आणि हे टुणकन निघाले. बहुधा भुजबळांनी सांगितलं असेल जेलमध्ये काय काय असतं. ते म्हणाले असतील जेलपेक्षा भाजपकडे गेलेलं बरं.
▪️ मी नितीन गडकरींना फोन करून सांगितलं की अहो समृद्धी रस्ता करून इतके दिवस झाले पण अजून तुम्ही फेन्सिंग का नाही केलं? रस्त्यावर अनेक प्राणी येत आहेत, त्यांचे अपघात होत आहेत, गाड्यांचे अपघात होत आहेत. इतकी साधी गोष्ट पण सरकारच्या लक्षात येऊ नये ?
▪️ आत्तापर्यंत मुंबई गोवा महामार्गावर खर्च झालेला पैसा १५,६६६/- कोटी रुपये आहे. तरीही रस्ता झाला नाही. फक्त काहींच्या तुंबड्या भरल्या गेल्या.
▪️ मी नितीनजींना विनंती केली होती की तुम्ही वैयक्तिक लक्ष घाला तर ते म्हणाले की अहो कॉन्ट्रॅक्टर पळून जातात. हे नेमकं मुंबई गोवा हायवेच्या बाबतीतच का घडलं? कोकणाचा विकास होऊ नये म्हणून कोणी प्रयत्न करतंय का?
▪️ आधी नाणार मग बारसूच्या प्रकल्पाच्या नावाखाली, कोकणी माणसाच्या हजारो एकर जमिनी कोणी बळकवल्या? ह्याचा शोध घेतलाच गेला पाहिजे.
▪️ मुंबई गोवा महामार्गावर आजपर्यंत २५०० लोकं मृत्युमुखी पडलेत. अनेकांना दुखणी लागली आहेत, गाड्यांचं नुकसान झालं आहे. तरीही त्याच लोकांना निवडून देत आहेत, त्यामुळे हे पुन्हा पुन्हा निवडून येणारे निवांत आहेत. ते टेंडर, टक्केवारीत व्यस्त आहेत.
▪️ जे आज खोके खोके ओरडत आहेत ना त्यांच्याकडे कंटेनर आहेत. ह्यांनी कोव्हीड पण नाही सोडला. निवडणुकीच्या वेळेस हे पुन्हा बाळासाहेबांच्या नावाने भावनिक करून मतं मागतील आणि आमची भोळीभाबडी जनता त्यांना पुन्हा भुलणार असेल तर ह्याच नरकयातना पुन्हा भोगाव्या लागतील.
▪️ २०२४ ला मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होईल असं आता सरकार सांगतंय. चांगलंच आहे, हे व्हायलाच हवं. पण पुढे काय? मुंबई-पुणे रस्ता झाला, आणि पुणे पसरत गेलं. घडलं काय तर पुण्याची पार वाट लागली. पुण्यात मराठी माणूस हा आक्रसत चालला आहे. हेच कोकणात होणार आहे.
▪️ गोव्यात २०२३ चा कायदा आहे की तुम्हाला सहज शेतजमीन घेता येणार नाही. आणि जर घेतली तर तिकडे शेतीच करावी लागली, तिथे इतर उद्योग, हॉटेलं उभारता येणार नाही.
▪️ गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की गोव्याचा आम्ही गुरुग्राम होऊ देणार नाही, थोडक्यात उत्तर भारतीयांना जमिनी घेऊन गोव्याची वाट लावू देणार नाही. आणि हे बोलणारा कोण तर भाजपचा मुख्यमंत्री.
▪️ ३७० कलम रद्द झाल्यावर काय सांगितलं की कोणीही आता काश्मिरात जमीन घेऊ शकता. मला आनंद आहे की ३७० रद्द झाला. मी तर अभिनंदन पण केलं होतं.
▪️ पण तुम्ही कश्मीर असो, हिमाचल असो की आपल्या ईशान्य भारतातील राज्य तिथे कोणत्याही बाहेरच्या माणसाना जमीन घेता येणार नाही. मग हा नियम महाराष्ट्रात का नाही ? बरं मला सांगा ३७० झाल्यावर तुम्ही म्हणालात की काश्मीरमध्ये कोणीही जमीन घेऊ शकतो मग आत्तापर्यंत अदानी किंवा अंबानी समूहाने जमीन का नाही घेतली ?
▪️ शिवडी-न्हावाशेवा रस्ता होणार तेव्हा बघा रायगड जिल्ह्याची काय अवस्था होते. तिथल्या जमिनी आधीच परप्रांतीयांनी विकत घेतल्या आहेत आणि पुढे जाऊ परिस्थिती अशी होणार कि फायदे कोणाचा होणार तर परप्रांतीयांचा आणि आपला मराठी माणूस त्यांच्याकडे नोकऱ्या करणार.
▪️ मी पिढ्यानपिढ्या महाराष्ट्रात राहणाऱ्या अमराठी माणसांच्या विरोधात नाही. माझ्या पक्षात अनेक अमराठी आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात माझा मंडणगडचा तालुकाध्यक्ष तर एक शीख सरदार आहे.
▪️ अमेरिकेतील एम्पायर स्टेट बिल्डिंग, त्यावर एकदा छोटं विमान आदळलं, त्याच्याखाली एकदा बॉंम्बस्फोट झाला होता तरीही बिल्डिंग दणकट आहे. ती बिल्डिंग १४ महिन्यांत झाली होती. आणि आपल्याकडे वरळी-वांद्रे सीलिंकला १२ वर्ष लागतात आणि मुंबई गोवा महामार्गाला १६ वर्ष लागली. काय बोलायचं?
▪️ अमेरिकेत १९२७ च्या महामंदीच्या काळात सरकारने लोकांना पैसा देता यावं म्हणून अमेरिकेत रस्त्यांचं जाळं उभारलं, त्याच्यावर आजची अमेरिका उभी राहिली.
▪️ माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना आवाहन आहे की, पनवेलपासून सावंतवाडीपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचं काम वेळेत व्हावं ह्यासाठी पक्ष म्हणून ताकदीने रस्त्यावर उतरा. सर्वसामान्य लोकांना त्रास होईल असं आंदोलन नको पण आंदोलन असं करा कि सरकारला धडकी भरली पाहिजे.
▪️ ह्या आंदोलनंतरही महाराष्ट्र सैनिकांनी जागृत राहावं. कोकणी माणसांच्या जमिनी कोणीही बळकावू नये हे पहावं. कोकणात उद्योग आलेच पाहिजेत पण ते कोकणच्या निसर्गाची हानी करून नाही. निसर्गाने कोकणाच्या रूपाने जे अद्भुत दान महाराष्ट्राच्या पदरात टाकलं आहे, त्याचं संवर्धन करूया.
MNS Chief Raj Thackeray Critic BJP Politics
Panvel Meeting Ajit Pawar Mumbai Goa Highway Road Potholes