प्रतिनिधी, नाशिक
राज्यातील राजकारणाला नवे वळण मिळण्याची चिन्हे आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती होण्याची चिन्हे आहेत. तसे संकेत दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून दिले जात आहेत. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आज नाशिक दौऱ्यावर असून दोन्ही नेते शासकीय विश्रामगृहावरच आहेत. त्यामुळे दोन्ही नेते एकमेकाला भेटण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील हे दोन्ही नेते एकमेकांना भेटल्यास त्यांच्यात युतीबाबत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या भेटीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. राज ठाकरे नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशकात दाखल असून मनसे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन ते सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीपूर्वीच मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी राज ठाकरे नाशिकमध्ये आले आहेत.
सध्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील तीन घटक पक्षांमध्ये कुरबुरी वाढल्याने आता नव्या राजकीय गणितांबाबत अनेक अंदाज लावले जात आहेत. कधी भाजप-शिवसेना तर कधी भाजप – मनसे युतीची चर्चा होत आहे.
भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून, मनसे परप्रांतियांच्या बद्दलची भूमिका बदलत नाही तो पर्यंत आमची युती शक्य नाही. परंतु राज ठाकरे हे महाराष्ट्राला हवे असलेले नेतृत्व आहे. मात्र, एकट्या मनसेच्या जिवावर सत्ता येणार नाही. राज ठाकरे आणि आमचा खूप जुना परिचय असून योग आला, तर त्यांना भेटेल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये आज रात्री उशिरापर्यंत भेट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, या भेटीत नाशिक, पुणे, ठाणे आणि मुंबई महापालिकेती युतीबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण पाटील आणि राज ठाकरे यांची पहिल्यांदाच ही भेट होणार आहे. त्यामुळे या भेटीतून राज्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.