नाशिक – आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अखेर मोठी घोषणा केली आहे. यापीर्वी एकदा नाशिक महापालिकेवर मनसेचा झेंडा फडकला आहे. आता पुन्हा एकदा सत्ता मिळविण्यासाठी मनसेने कंबर कसली आहे. त्यामुळेच मनसेचे नेते अमित ठाकरे आणि सरचिटणीस संदीप देशपांडे हे दोघेही आजपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी नाशकातील पक्ष संघटनेच्या बांंधणीबाबत ठोस कार्यवाही चालू केली आहे. त्यासाठीच पदाधिकाऱ्यांच्या बैठका आणि गाठी-भेटी सुरू झाल्या आहेत. आगामी निवडणुकीबाबत ठाकरे आणि देशपांडे यांनी मोठा खुलासा केला आहे. काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची येथील विश्रामगृहावर भेट झाली होती. त्यामुळे भाजप आणि मनसेची युती होणार असल्याच्या जबरदस्त चर्चा रंगल्या आहेत. मात्र, आज ठाकरे आणि देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे की, नाशिक महापालिका निवडणुकीत मनसे कुणाशीही हातमिळवणी करणार नाही. तर, स्वबळावर लढणार आहे. त्यासाठी यापुढील काळात मनसेच्यावतीने सर्व ती तयारी केली जाईल. सर्वोत्तम उमेदवार दिले जातील आणि मनसेचा झेंडा महापालिकेवर फडकवला जाईल असे ठाकरे आणि देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे.
पिता-पुत्रांचा दौरा
मुंबई – आगामी महापालिका निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे तर त्यांचे पुत्र आणि नेते अमित ठाकरे यांनी विविध शहरांचे दौरे सुरू केले आहेत. अमित यांच्याकडे नाशिक महापालिका निवडणुकीची जबाबदारी दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच अमित हे आजपासून तीन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आले आहेत. तर, राज हे पुणे दौऱ्यावर गेले आहेत. दोघेही मनसे पक्ष बांधणीच्या दृष्टीने ठोस निर्णय घेणार आहेत. तसेच, संभाव्य उमेदवारांची चाचपणीही करणार आहेत. दोन्ही शहरातील सध्याचे ज्वलंत आणि जिव्हाळ्याचे प्रश्न काय आहेत, निवडणुकीत ते प्रभावीपणे कसे मांडता येतील, यासाठीही पिता-पुत्रांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. तसेच, अमित यांना राजकारणात स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी हे दौरे आणि आगामी नाशिक महापालिका निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.