मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या विधान परिषद निवडणुकीचा निकाल अखेर लागला आहे. या निवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असे चित्र होते. १० जागांसाठी तब्बल ११ उमेदवार रिंगणात असल्याने या निवडणुकीकडे सगळ्यांचेच लक्ष लागले. राज्यसभा निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला मोठा शह दिला. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा विधान परिषद निवडणुकीवर खिळल्या होत्या. आज सकाळपासून सायंकाळपर्यंत मतदान झाले. त्यानंतर रात्री ८ वाजेच्या सुमारास मतमोजणी सुरू झाली.
राज्य विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी सोमवार दि. 20 जून 2022 रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली. उमेदवारांना जिंकण्यासाठीचा 2600 हा मतमूल्यांचा कोटा पूर्ण करण्यासाठी फेरीनिहाय मिळालेले मतमूल्य पुढीलप्रमाणे :
पहिल्या फेरीअखेर राम शिंदे (भाजपा) यांना 3000, श्रीकांत भारतीय (भाजपा) यांना 3000, एकनाथ खडसे (राष्ट्रवादी काँग्रेस) यांना 2900, प्रवीण दरेकर (भाजपा) यांना 2900, रामराजे नाईक निंबाळकर (राष्ट्रवादी काँग्रेस) यांना 2700, श्रीमती उमा खापरे (भाजपा) यांना 2700, सचिन अहिर (शिवसेना) यांना 2600 आणि आमश्या पाडवी (शिवसेना) यांना 2600 तर पाचव्या फेरीअखेर प्रसाद लाड (भाजपा) यांना 2857 इतके मतमूल्य मिळून त्यांनी विजयासाठीचा कोटा पूर्ण केला.
दहाव्या व शेवटच्या फेरीअखेर भाई जगताप (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) यांना 2474 इतकी मतमूल्य तर चंद्रकांत हंडोरे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) यांना 2200 इतकी मतमूल्य मिळाली. या फेरीअखेर अधिक मतमूल्यांच्या आधारे श्री.जगताप हे विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री.राजेंद्र भागवत यांनी जाहीर केले.
या निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते अशी
शिवसेना – सचिन अहिर (२६) आणि आमश्या पाडवी (२६)
राष्ट्रवादी कॉंग्रेस – एकनाथ खडसे (२९) आणि रामराजे नाईक-निंबाळकर (२८)
भाजप – राम शिंदे (३०), श्रीकांत भारतीय (३०), उमा खापरे (२७), प्रवीण दरेकर (२९), प्रसाद लाड (२६)
काँग्रेस – भाई जगताप (२६)
फडणवीसांनी पुन्हा दिला शह
राज्यसभा निवडणुकीत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी तिन्ही पक्षांना चांगलाच शह दिला. त्यानंतर आता विधान परिषद निवडणुकीतही फडणवीस यांनी पाचही उमेदवार विजयी केले आहे. त्यामुळे ही बाब महाविकास आघाडीला जोरदार चपराक असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसने चंद्रकांत हांडोरे आणि भाई जगताप यांना रिंगणात उतरविले. मात्र, हांडोरे यांचा पराभव झाला आहे. पुरेसे संख्याबळ नसतानाही भाजपचे प्रसाद लाड विजयी झाले आहेत.
mlc election results declare politics mahaalliance bjp shivsena congress ncp candidates