मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दहा वर्षांपूर्वी मोदी लाटेच्या जोरावर अख्ख्या देशात ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत निवडणुका जिंकणाऱ्या भाजपला आत्मचिंतन करायला लावणारे निकाल गेल्या काही वर्षांमध्ये हाती येत आहेत. मग ग्रामपंचाती असो, जिल्हा परिषचा असो, विविध राज्यांच्या विधानसभा असो किंवा अलीकडेच महाराष्ट्रात झालेली विधानपरिषदेची निवडणूक असो. प्रत्येक निकाल भाजपला नव्याने विचार करायला लावणारा आहे. त्यातही अलीकडेच लागलेले महाराष्ट्र विधानपरिषदेचे निकाल तर भाजपच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरले आहे.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमध्ये दादागिरी करणाऱ्या भाजपला त्यांच्या बालेकिल्ल्यांमध्ये जोरदार धक्के बसले आहेत. नेहमीप्रमाणे ही निवडणूक देखील सहजतेने घेणाऱ्या भाजपला विरोधकांनी केलेली तयारी महागात पडली. तेच तेच उमेदवार उभे करणे किंवा उमेदवारच उभा न करणे या दोन्ही बाबी महाविकास आघाडी किंवा भाजपविरोधी पक्षांना बळकटी देणाऱ्या ठरल्या. अगदी नागपूरचेच उदाहरण घेतले तर दोन वर्षांपूर्वी झालेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल बघता येईल.
संपूर्ण पूर्व विदर्भात दौरे करून, नोंदणी करून स्वतःचा मतदार तयार करणाऱ्या प्रा. अनिल सोलेंना तिकीट नाकारून फडणवीस यांचे निकटवर्तीय संदीप जोशी यांना तिकीट देण्यात आलं. आणि महाविकास आघाडीने या वादाचा लाभ घेतला. त्यात काँग्रेसचे अॅड. अभिजित वंजारी विजयी झाली. यंदाच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत गेले दोन टर्म भाजपचे शिक्षक आमदार असलेले नागो गाणार यांना पुन्हा तिकीट देण्यात आले. नाराजी असल्यामुळे संघप्रणित शिक्षक परिषदेकडून उभे करण्यात आले आणि भाजपने थेट पाठिंबा दिला. परिणामी महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले बाजी मारून गेले. सुशिक्षित वर्ग आपल्याच बाजुने आहे, हा ओव्हर कॉन्फिडन्स भाजपला नडला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. नाशिकमध्ये काँग्रेसच्या बंडखोर उमेदवाराच्या पाठिशी उभे राहिले आणि कोकणात शिवसेनेतून भाजपमध्ये आलेले ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विजय मिळवला. त्यामुळे त्याचेही पूर्ण क्रेडिट भाजपला घेता येणार नाही.
अमरावतीत तेच घडले
माजी मंत्री रणजित पाटील हे देवेंद्र फडणवीस यांचे खास मित्र. पहिल्यांदा राज्यात सत्ता आली तेव्हा विधानपरिषदेतून थेट महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री झाले. नंतर सत्ता गेली आणि आता आली तर त्याचा उपयोग नव्हता. त्यामुळे विधानपरिषदेच्या माध्यमातून त्यांचा पुनःप्रवेश करण्याचा प्रयत्न झाला. आता पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांना उतरवण्यात आले आणि खास मित्राने म्हणजे फडणवीस यांनी त्यांच्यासाठी अमरावतीत सभा घेतली. तरीही काँग्रेसचे धीरज लिंगाडे विजयी झाले आणि भाजपला पुरता हादरा बसला. सुशिक्षित वर्ग भाजपला नाकारत आहे, याची प्रचिती काही वर्षांपूर्वीच यायला लागली, तरीही अद्याप भाजपचे डोळे उघडलेले नाहीत, असेच सिद्ध होते.
MLC election Result Analysis Politics BJP Mahavikas Aghadi