मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यसभेनंतर आता विधानपरिषदेची निवडणूक होत आहे. येत्या २० जूनला मतदान होणार आहे. राज्यसभा निवडणुकीत तीन जागा मिळवत भाजपने मुसंडी मारली होती. त्यामुळे भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे विधानपरिषदेसाठी भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. काँग्रेसने भाई जगताप यांना अतिरिक्त उमेदवारी दिली आहे. तर भाजपने प्रसाद लाड यांना सहावा उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला २७ मतांची गरज आहे. काँग्रेसकडे सध्या ४४ आमदार आहेत. भाई जगताप आणि चंद्रकांत हांडोरे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी काँग्रेसला १० अतिरिक्त मतांची गरज आहे. एमआयएमचे एक मत चंद्रकांच हांडोरे यांना मिळणार आहे. परंतु दुसऱ्या मताबाबत एमआयएमने विचार केलेला नाही. काँग्रेसला आणखी ९ मतांची गरज आहे. या दोघांचे भवितव्य आता अपक्ष आमदारांवर अवलंबून आहे.
भाजपने प्रवीण दरेकर, उमा खापरे, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय आणि राम शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. भाजपकडे सध्या १०६ आमदार आहेत, त्यांना ७ अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. ११३ संख्याबळ असले तरी भाजपला सर्व आमदार निवडून आणण्यासाठी १३५ मतांची गरज आहे. राज्यसभेत भाजपला १२३ मत मिळाले होते. हे पाहता त्यांना १२ अतिरिक्त मतांची गरज आहे. हे मत भाजप कुठून आणणार हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. या सर्वांची भिस्त आता अपक्ष आमदारांवर आहे.
शिवसेनेने सचिन आहिर आणि आमषा पाडवी यांना रिंगणात उतरवले आहे. या दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे. शिवसेनेकडे ५५ आमदार आहेत. तसेच सेनेला बच्चू कडू यांचे दोन आमदार, शंकरराव गडाख, आशिष जैस्वाल, चंद्रकांत पाटील, गीता जैन अशा अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. बच्चू कडू आणि शंकरराव गडाख हे शिवेसनेच्या कोट्यातून मंत्री झाल्याने त्यांची मते शिवसेनेकडे आहेत. या आमदारांचा पाठिंबा मिळविण्याचा काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत. हे मत कोणाकडे जाणार हे निवडणुकीच्या दिवशी समजेल.
राष्ट्रवादी काँग्रेसने रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीकडे सध्या ५३ आमदार आहेत. त्यापैकी नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदान करता येणार नाही. त्यामुळे त्यांच्याकडे ५१ संख्याबळ आहे. संजय मामा शिंदे, देवेंद्र भुयार यांच्यासह काही आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः लक्ष घातले असून, दोन्ही उमेदवारांच्या निवडीसाठी ते प्रयत्न करत आहेत.