नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्राचे माजी मंत्री अनिल देशमुख आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. दोन्ही नेते सध्या वेगवेगळ्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत. महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान होत आहे. त्यामुळेच देशमुख आणि मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत मतदानाची परवानगी मागितली होती. यापूर्वी उच्च न्यायालयाने दोघांना मतदानाची परवानगी नाकारली होती.
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री देशमुख आणि कॅबिनेट मंत्री मलिक यांच्या वकिलांनी या प्रकरणी तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली. विशेष म्हणजे 288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत केवळ 285 मते आहेत. कारण मलिक आणि देशमुख न्यायालयीन कोठडीत असून त्यातच शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचा मृत्यू झाला आहे. विधान परिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक चुरशीची आहे. त्यामुळे एकेका मताचे महत्त्व मोठे आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दोन्ही नेत्यांच्या याचिका फेटाळून लावल्या. न्यायमूर्ती एन जे जमादार यांच्या खंडपीठाने शुक्रवारी संध्याकाळपर्यंत लेखी आदेश तयार करू, असे सांगितले होते. त्यावर उत्तर देताना मलिक यांची बाजू मांडणारे अधिवक्ता अमित देसाई यांनी सोमवारी निवडणूक असल्याने थोडे लवकर आदेश द्यावेत, असे सांगितले.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात मलिक न्यायालयीन कोठडीत आहे. तर, ईडीने देशमुख यांच्याविरोधात चौकशी सुरू केली असून, त्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने राज्यसभा निवडणुकीतही मतदान करण्यास दोघांना परवानगी नाकारली होती.
mlc election nawab malik anil deshmukh supreme court hearing ncp leader politics