मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधान परिषदेच्या १० जागांसाठी येत्या २० जून रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक ९ जून आहे. शिवसेना आणि भाजपने त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. आता काँग्रेसनेही त्यांचे दोन उमेदवार जाहीर केले आहेत.
महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश आणि बिहार विधान परिषदेतून 06 जुलै 2022 ते 21 जुलै 2022 या कालावधी दरम्यान निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या जागा भरण्यासाठी विधानपरिषदांच्या द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम, निवडणूक आयोगाकडून बुधवारी रात्री जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विधानपरिषदेचे 10 सदस्य तसेच उत्तर प्रदेश आणि बिहार विधानपरिषदांच्या एकूण 20 सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. या रिक्त होणाऱ्या जागांसाठी येत्या 10 जून रोजी निवडणूक होणार आहे.
महाराष्ट्रातून सदाशिव खोत, सुजितसिंग ठाकूर, प्रवीण दरेकर, सुभाष देसाई, रामराजे नाईक-निंबाळकर, संजय दौंड, विनायक मेटे, प्रसाद लाड, दिवाकर रावते या विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ येत्या 7 जुलै रोजी संपुष्टात येणार आहे तर, रामनिवास सिंह यांचा कार्यकाळ 2 जानेवारी 2022 रोजी संपूष्टात आलेला आहे. सदरील जागांसाठी विधानसभेच्या सदस्यांकडून विधानपरिषदेवर निवड केली जाणार आहे.
काँग्रेसने चंद्रकांत हांडोरे आणि भाई जगताप यांना विधान परिषद निवडणुकीसाठी संधी दिली आहे. मात्र, राजस्थानमध्ये झालेल्या पक्षाच्या नवसंकल्प शिबीरात घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. युवकांना आणि महिलांना संधी दिली जाईल, असे धोरण पक्षाने जाहीर केले आहे. मात्र, दोन्ही उमेदवारांचे वय पाहता हे धोरण केवळ कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.
Congress announces Chandrakant Handure and Bhai Jagtap as candidates for the biennial elections to the Legislative Council of Maharashtra to be elected by the MLAs pic.twitter.com/0vqrgaOGzO
— ANI (@ANI) June 8, 2022
निवडणूक कार्यक्रम असा
विधानपरिषदेच्या या निवडणुकीसाठी आयोगाकडून अधिसूचना दि. 2 जून, 2022 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. तसेच निवडणूक अर्ज भरण्याची अंतिम तारीख 9 जून, 2022 पर्यंतची आहे. अर्जांची छाननी 10 जून, 2022 रोजी होणार असून, 13 जून, 2022 पर्यंत अर्ज मागे घेता येतील. मतदान 20 जून 2022 रोजी सकाळी 9.00 ते सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत होणार असून, त्याच दिवशी सायंकाळी 5.00 वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.
संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांनी या निवडणुकीचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सर्व आवश्यक त्या उपाय योजना करण्याविषयी निर्देश आयोगाकडून दिले गेलेले आहेत. निवडणुका आयोजित करताना कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सध्याच्या सूचनांचे पालन केले जात आहे किंवा कसे़ याची खात्री करण्यासाठी संबंधित मुख्य सचिवांना राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.