मनीष कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा
विधानपरिषेदच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर प्रतिज्ञापत्रातून उमेदवारांची मालमत्ताही जाहीर झाली आहे. मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँकेत एकहाती सत्ता राखणारे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या मालमत्तेत गेल्या सहा वर्षात दुप्पट वाढ झाली आहे. त्यांची मालमत्ता साडेसात कोटींवर पोहोचली असून, त्यांच्यावर विविध स्वरूपातील १४ गुन्हे दाखल आहेत. तर स्वच्छतेची कामे घेणारे ठेकेदार प्रसाद लाड यांची १५२ कोटींची मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रातून उघड झाले आहे.
विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ते व्यावसायिक असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. विशेष म्हणजे मजूर असल्याचे सांगून मुंबै बँकेत मजूर संघाकडून निवडणूक लढून त्यांनी बँकेत आता एकहाती सत्ता राखली आहे. प्रवीण दरेकर यांची सध्या स्थावर आणि जंगम मिळून ७ कोटी ४२ लाखांची मालमत्ता आहे. दरेकर यांची स्थावर मालमत्ता २ कोटी ३० लाख, तर पत्नीची ४ कोटी १८ लाखांची मालमत्ता आहे. त्यांची जंगम मालमत्ता १ कोटी १८ लाखांची आहे. त्यांच्याविरधातील बहुतांश गुन्हे राजकीय आंदोलनातील आहेत. काही प्रकरणे न्यायप्रविष्ठ असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
भाजपचे उमेदवार प्रसाद लाड हे मुंबई जिल्हा बँकेचे संचालक आणि क्रिस्टल संचालक आहेत. गेल्या पाच वर्षात विधानपरिषदेचे सदस्य असताना त्यांची २०१ कोटी रुपयांची मालमत्ता होती. परंतु आता ती घटून १५२ कोटी रुपयांवर आली आहे. प्रसाद लाड यांची जंगम मालमत्ता ३२ कोटी ५९ लाख, तर पत्नीची ५४ कोटी ६५ लाखांची आहे. तर हिंदू अविभक्त कुटुंबाची ७४ लाखांची मालमत्ता आहे. त्यांची स्थावर मालमत्ता ६४ कोटी ४६ लाखांची असून, त्यांची ३० कोटी ९१ लाख, तर पत्नीची २९ कोटी १५ लाखांच्या मालमत्तेचा समावेश आहे. लाड यांनी तीन कोटी ६७ लाखांचा प्राप्तीकर भरला नसून, ते प्राप्तीकर विभागात वादात असल्याचे म्हटले आहे.
शिवसेनेचे उमेदवार सचिन आहिर यांची स्थावर मालमत्ता ४ कोटी ५६ लाखांची तर जंगम मालमत्ता ३ कोटी ६९ लाखांची आहे. सचिन आहिर यांच्यापेक्षा त्यांची पत्नी श्रीमंत आहे. पत्नीची स्थावर मालमत्ता १८ कोटी ५१ लाख, तर जंगम मालमत्ता ९ कोटी ६६ लाखांची आहे. ३६ कोटी ४२ लाखांची मालमत्ता असलेल्या सचिन आहिर यांच्याकडे चारचाकी वाहन नाही. त्यांच्या मावळ आणि रत्नागिरी येथील संगमेश्वर येथे जमिनी आहेत. मुंबईत व्यापारी गाळे, घरे अशी कोट्यवधींची मालमत्ता आहे.