विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्य सरकारने राज्यपालांकडे पाठविलेल्या विधानपरिषदेच्या १२ आमदारांची यादी कुणाकडे आहे, या प्रश्नाचे कोडे अखेर उलगडले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या ठरावानंतर राजभवनाकडे पाठविलेली ही यादी कुठे आहे असा प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून पडला होता. याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दाखल केलेल्या अपिलावर आज सुनावणी झाली. त्यात राज भवनाच्या उपसचिव प्राची जांभेकर यांनी स्पष्ट केले आहे की, ही यादी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडेच आहे.
महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांची १२ नावे राज्यपालांकडे पाठविली होती. ही यादी ६ नोव्हेंबर २०२० रोजी राजभवनात सादर केली होती. अद्याप यावर कुठलाही निर्णय राज्यपालांनी घेतलेला नाही. त्यामुळे राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असा संघर्ष निर्माण झाला आहे. तसेच, या प्रश्नी राजकारणही पेटले आहे. या यादीसंदर्भात गलगली यांनी राज भवनाकडे माहितीच्या अधिकारात माहिती मागितली होती. ही यादी राज्यपालांकडे नसल्याचे राज भवनाकडून उत्तरात सांगण्यात आले होते. त्यामुळे ही बाब राज्यभर चर्चेची ठरली होती. अखेर गलगली यांनी या उत्तरावर पुन्हा अपिल दाखल केले. त्याची सुनावणी झाली. अखेर ही यादी राज्यपालांकडेच असल्याचे आजच्या सुनावणीत स्पष्ट झाले आहे.