इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
एमआय न्यू यॉर्कने २०२५ च्या मेजर लीग क्रिकेट (एमएलसी) स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. केवळ तीन हंगामांतच मुंबई इंडियन्सने दुसऱ्यांदा हा प्रतिष्ठेचा किताब जिंकला असून, जागतिक स्तरावरील हे त्यांचे एकूण १३वे विजेतेपद ठरले आहे. एकट्या २०२५ सालातच मुंबई इंडियन्सने तीन मोठ्या ट्रॉफीज आपल्या नावे केल्या आहेत – वर्षाच्या सुरुवातीला डब्ल्यूपीएल (महिला प्रीमियर लीग) मध्ये मुंबई इंडियन्स महिला संघ विजेता ठरला होता, त्यानंतर एमआय केपटाऊनने दक्षिण आफ्रिकेतील SA20 लीग जिंकली, आणि आता एमआय न्यू यॉर्कने अमेरिकेत एमएलसी जिंकून विजयी त्रिकुट पूर्ण केले आहे.
आजच्या या ऐतिहासिक विजयाबाबत नीता एम. अंबानी म्हणाल्या, “मुंबई इंडियन्स कुटुंबासाठी हा अतिशय खास आणि अभिमानाचा क्षण आहे. केवळ तीन वर्षांत दुसऱ्यांदा एमएलसी ट्रॉफी जिंकणे हे आपल्या टीमच्या उत्कटतेचे, परस्पर विश्वासाचे आणि संघभावनेचे प्रतीक आहे. आमच्या सर्व चाहत्यांचे – मुंबई इंडियन्स पलटनचे – मनापासून आभार, जे नेहमी आमच्यासोबत उभे राहिले. संघातील प्रत्येक खेळाडू, प्रशिक्षक, कर्मचारी आणि जागतिक मुंबई इंडियन्स कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे अभिनंदन!”
विजयानंतर आकाश एम. अंबानी यांनीही भावना व्यक्त केल्या: “एमआय न्यू यॉर्कचे हे दुसरे एमएलसी विजेतेपद आमच्यासाठी अत्यंत समाधानकारक आहे. यावर्षी भारत, दक्षिण आफ्रिका आणि अमेरिका—या तीन देशांतील विजेतेपद ही खऱ्या अर्थाने टी20 क्रिकेटमधील हॅट्ट्रिक आहे. हे यश म्हणजे आमच्या संघसंस्कृतीवरचा, सातत्याने घेतलेल्या मेहनतीवरचा आणि खेळाडूंमधील समर्पणावरचा ठसा आहे. एमआय न्यू यॉर्क संघातील प्रत्येक सदस्याला या अफलातून कामगिरीसाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा!”
मुंबई इंडियन्सचे पाच संघ तीन खंडांतील चार देशांमध्ये विविध टी20 लीगमध्ये सक्रिय असून, त्यांनी एकूण १३ विजेतेपदे मिळवले आहेत –
• ५ वेळा आयपीएल विजेता
• २ वेळा महिला प्रीमियर लीग विजेता
• २ वेळा मेजर लीग क्रिकेट विजेता
• २ वेळा चॅम्पियन्स लीग टी20 विजेता
• १ वेळा ILT20 (एमआय एमिरेट्स, २०२४)
• १ वेळा SA20 (एमआय केपटाऊन, २०२५)
या घवघवीत यशामुळे मुंबई इंडियन्स ही जागतिक टी20 क्रिकेटमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझी ठरली आहे.