मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत देशातील सर्व मुख्यमंत्र्यांचा फोटो सर्वत्र व्हायरल झाला आहे. फोटोमध्ये दिसते आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिसऱ्या रांगेत उभे आहेत. देशाला सर्वाधिक कर देणाऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला तिसऱ्या रांगेत उभे करुन महाराष्ट्राचा आणि मुख्यमंत्र्यांचा अपमान झाल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. आता याप्रकरणी शिंदे गटाचे आमदार व माजी मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले आहे.
वास्तविक पाहता उदय सामंत हे शिंदे गट गटातील आमदारांनी बंडोरखोरी केल्यानंतर काही काळ उद्धव ठाकरे यांच्या गटातच होते. त्यामुळे ते निष्ठावंत समजले जात असताना अचानक त्यांनी गुवाहाटी गाठली आणि ते शिंदे गटाला जाऊन मिळाले तेव्हापासून उदय सामंत हे चर्चेत आहेत. आता तर ते मुख्यमंत्री शिंदे यांची बाजू उचलून धरत असल्याने आणखीनच चर्चा वाढत आहे.
निती आयोगाच्या नियामक परिषदेच्या रविवारी झालेल्या बैठकीमधील एक फोटो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. या बैठकीला उपस्थित असणाऱ्या सर्व मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नीति आयोगाच्या अधिकाऱ्यांचा हा फोटो असून या फोटोत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अगदी शेवटच्या रांगेत उभे असल्याचं दिसत आहे. याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आक्षेप नोंदवल्यानंतर आता शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी हा फोटो आणि त्यासंदर्भात सुरु असणाऱ्या मान-अपमानाच्या चर्चांवर मत व्यक्त केले आहे.
सामंत म्हणाले की, कुठं तरी राजकारणासाठी राजकारण करण्यात अर्थ नाही. महाराष्ट्राचा मान-सन्मान दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने नक्की वाढलेला आहे. त्याची प्रचिती ओबीसी आरक्षणापासून अनेक गोष्टींमधून आलीय. शिंदेंचा अपमान केलाय असं मला तरी वाटत नाही,” असेही सामंत यांनी स्पष्ट केले.
निती आयोगाच्या बैठकीनंतर काढण्यात आलेल्या फोटोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शेवटच्या रांगेत स्थान देणे हा मराठीजनांचा अपमान आहे, अशी प्रतिक्रिया रोहीत पवार यांनी दिली आहे. “एकनाथ शिंदे हे मोठे नेते आहेत. तसेच ते देशाच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक मराठी मनाला यामुळे नक्कीच दुःख झाले आहे. यापुढं असे होणार नाही, याची दक्षता केंद्र सरकार घ्यावी”, असे ट्वीट रोहीत पवार यांनी केले आहे.
रोहित पवार यांनी केलेल्या या ट्विटवरुन उदय सामंत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अगदी शेवटच्या रांगेत उभं केलं आहे, असं रोहित पवार यांनी फोटो ट्विट करत म्हटलं आहे, असं म्हणत उदय सामंत यांची या विषयावरील प्रतिक्रिया पत्रकारांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावर उत्तर देताना उदय सामंत यांनी, “फोटो बघितल्यावर एक लक्षात येतं की एकनाथ शिंदे केवळ फोटोसाठी तिथे उभे होते,” असं म्हटलं आहे.
तसेच उदय सामंत पुढे म्हणाले की,“याच्या’ पुर्वीचा एक प्रसंग मी आपल्याला सांगू इच्छितो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमात शिंदे पहिल्या रांगेत होते याची आठवण करुन दिली. “राष्ट्रपतींचा शपथग्रहण सोहळा ज्या दिवशी झाला त्या दिवशी एकनाथ शिंदे हे पहिल्या रांगेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूला होते. ते कोणाला दिसलं नाही हे आपलं दुर्दैव आहे,” असेही सामंत म्हणाले.
MLA Uday Samant on CM Shinde Delhi Photo