नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नांदगाव मतदारसंघाचे आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू नेते सुहास कांदे यांनी एक मोठा गौप्यस्फोट करुन खळबळ उडवून दिली आहे. आपल्या शालकाला (बायकोच्या भावाला) वाचविण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचा भक्कम दावा कांदे यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
उद्धव ठाकरे यांची मालेगावमध्ये जाहीर सभा झाली. या सभेला प्रचंड गर्दी झाली. तसेच, ठाकरे यांनी बंडखोरांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. या सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी आज कांदे यांनी अनेक दावे केले आहेत. कांदे पुढे म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. पण त्यांना राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते. त्यावेळी कोणतेही अधिवेशन सुरू नव्हते. असे असतानाही त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. आपले शालक श्रीधर पाटणकर यांना वाचवण्यासाठी त्यांनी हा राजीनामा दिल्याचा गौप्यस्फोट कांदे यांवी केला आहे.
ईडीने गेल्या वर्षी श्रीधर पाटणकर यांच्या घरावर छापा टाकला होता. तेव्हापासून पाटणकरांच्या प्रकरणाचे गांभिर्य वाढले होते. हे प्रकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचू शकते, अशी जोरदार चर्चा त्यावेळी रंगली होती.
रविवारी उद्धव ठाकरे यांनी मालेगावमध्ये जाहीर सभेला संबोधित केले. येथे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपासून भाजपपर्यंत निशाणा साधला. शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनाही घेरले. कांद्याला भाव मिळाला असे तुम्ही म्हणता पण गेल्या वर्षी एका कांद्याला भाव मिळाला, असे ठाकरे म्हणाले होते. गेल्या वर्षी एक कांदा (आमदार सुहास कांदे) ५० कोटींना विकला गेला होता.
सुहास कांदेंचे प्रत्युत्तर
उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर आमदार सुहास कांदे यांनीही पलटवार केला. ते म्हणाले की, ‘या आरोपांची चौकशी करण्यासाठी माझी नार्को टेस्ट झाली पाहिजे. माझ्यासोबत उद्धव ठाकरेंचीही नार्को टेस्ट झाली पाहिजे. याशिवाय मी ज्या कंत्राटदारांची नावे घेतो (आयआरबी, म्हैसकर) यांचीही नार्को टेस्ट व्हायला हवी. यानंतर दूध का दूध आणि पानी का पानी होईल. कोण किती पाण्यात आहे हे सुद्धा यातून कळेल. कांदे पुढे म्हणाले की, श्रीधर पाटणकर यांचीही नार्को टेस्ट झाली पाहिजे. तसेच त्या काळात उद्धव ठाकरेंनी किती लोकांना फोन केला, किती लोकांनी मध्यस्थी केली. या सर्व बाबींचीही चौकशी व्हायला हवी.
कांदे यांच्या आरोपांवर उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी स्पष्टीकरण दिले. सुहास कांदे यांनी राजकारणाची पातळी इतकी खालावू नये, असे दुबे म्हणाले. केंद्रात आणि राज्यात त्यांचेच सरकार आहे. तसे असेल तर त्यांची चौकशी व्हावी व विधाने करून कोणाचीही बदनामी करू नये. 50 कोटींचा प्रश्न आहे, असा आरोप महाराष्ट्र आणि देशातील जनतेकडून केला जात आहे, असे दुबे म्हणाले.
आमदार कांदे यांच्या प्रतिक्रीयेचा बघा हा व्हिडिओ
MLA Suhas Kande Allegation on Uddhav Thackeray CM Resignation