नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देवळाली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे या आपल्या अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन विधान भवन परिसरात आज पोहचल्या आहेत. त्यामुळेच सध्या संपूर्ण विधिमंडळात त्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत.
आजपासून हिवाळी अधिवेशनाला नागपूर येथे सुरुवात झाली. या अधिवेशनात सहभाग घेण्यासाठी आ. आहिरे या आपल्या अडीच महिन्याच्या प्रशंसक या बाळाला घेऊन पोहचल्या आहेत. नव्याने सुरु झालेल्या समृध्दी महामार्गावरुन प्रवास करत त्यांनी नागपूर गाठले. त्यानंतर त्यांनी अधिवेशनात आज सहभाग घेतला. बाळ आई शिवाय राहू शकते नसल्यामुळे मी त्याला घेऊन आल्याचे त्यांनी सांगितले. देवळाली या माझ्या मतदारसंघाचे प्रश्न महत्त्वाचे असून ते विधानसभेत मांडण्यासाठी मी आले आहे. त्याचबरोबर अडीच महिन्याच्या बाळाची आई म्हणून त्याच्याबद्दलही कर्तव्य बजावणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे मी दोन्ही कर्तव्य एकाच वेळी बजावत असल्याचे त्यांनी सांगितले.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी आपल्या अडीच महिन्याच्या बाळासमवेत उपस्थित असलेल्या आमदार सौ. सरोज अहिरे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले आणि दोघा मायलेकांची आस्थेने विचारपूसही केली. विधानसभा सदस्य सौ. अहिरे आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात उपस्थित राहण्यासाठी आल्या त्या आपल्या अडीच महिन्याच्या प्रशंसक या बाळासमवेत. याबाबत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना माहिती मिळताच त्यांनी आमदार सौ. आहेर यांची भेट घेऊन त्यांची आणि बाळाची विचारपूस केली.
विधिमंडळात लोकप्रतिनिधी म्हणून कायदे बनवणे आणि विधिमंडळाच्या बाहेर मातृत्वाची जबाबदारी पार पाडणे हे निश्चितच आव्हानात्मक आहे. या दोन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडणे म्हणजे म्हणजे स्त्रीमधील कर्तृत्वाचा आणि मातृत्वाचा अनोखा सन्मान असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्याच्या विधिमंडळात पहिल्यांदाच अशी घटना घडत असल्याने त्याबद्दल त्यांचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर कौतुक केले. यावेळी आमदार सरोज अहिरे यांचे पती डॉ. प्रवीण वाघ आणि सासुबाई कल्पना वाघ हे देखील उपस्थित होते.
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1604767269292085248?s=20&t=87QfxvCkdsFT3YrOtqpWtw
MLA Saroj Ahire in Assembly Session with Infant baby politics Nagpur Winter