नाशिक – दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा व वाहतुकीस अत्यंत महत्त्वाचा अशा मोहाडी फाटा- सैय्यद पिंप्री – लाखलगाव – हिंगणवेढे- कोटमगाव- जाखोरी- चांदगिरी ते शिंदे या राष्ट्रीय महामार्ग ५० पर्यंतच्या दुरुस्तीसाठी अकरा कोटी रुपये आमदार सरोज बाबुलाल आहिरे यांनी सतत पाठ पुरावा करून मंजुर करून घेतले आहे. या राष्ट्रीय महामार्ग ३ ते राष्ट्रीय महामार्ग ५० पर्यंतच्या रस्त्या दरम्यान अनेक महत्वाची गावे जोडलेली आहेत. त्या गावांतून द्राक्षे, टमाटे, भाजीपाला, ऊस, कांदे अशी पिके घेतली जात असल्याने हा परिसर सधन बागायती असल्याने रस्त्यावर सतत वाहतूक असते. शिवाय दोन महामार्गांना हा रस्ता जोडत असल्याने बाहेरील अवजड वाहनांनाही हा रस्ता वाहतुकीस सोईचा वाटतो. गत तीन ते चार वर्षांत या रस्त्याची अत्यंत दैन्यावस्था झाली होती. रस्ता जागोजागी उखडला होता. खड्डेमय झाला होता. त्यावर अपघात होत होते. दळणवळणासाठी ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागत होती. हा अतिशय महत्त्वाचा व प्रचंड रहदारीचा रस्ता दुरुस्त व्हावा म्हणुन ग्रामस्थांची मागणी होती. या मंजुर कामामुळे हा रस्ता दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने ग्रामस्थांचा त्रास थांबणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांत समाधान व्यक्त होत आहे. हा रस्ता चार टप्प्यांत दुरुस्त करण्यात येणार आहे.