मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या २ जुलैला शरद पवारांची साथ सोडून अजित पवार भाजप-शिंदे गटासोबत सत्तेत सामील झाले. उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. त्यावेळी पवार विरुद्ध पवार हा वॉर संपूर्ण देशाने बघितला. मात्र आता विधीमंडळ अधिवेशनात अजित पवार विरुद्ध रोहित पवार असा संघर्ष बघायला मिळाला.
अजित पवार यांनी काकांची साथ सोडून सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा रोहित पवार यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यामुळे हा वाद आता चांगलाच गाजणार आहे, असे स्पष्ट दिसत होते. त्यातच विधीमंडळ अधिवेशन सुरू झाल्यापासून रोहित पवार सरकारच्या विरोधात आक्रमक असल्याचे बघायला मिळत आहे. आता त्यांनी कर्जत जामखेड एमआयडीसी प्रश्नावर विधीमंडळ परिसरात आंदोलन केल्यामुळे दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी उडाल्या आहेत.
विधीमंडळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बॅनर घेऊन रोहित पवार बसले. ‘एमआयडीसीला मंजुरी मिळालीच पाहिजे. कर्जत जामखेडच्या तरुणांना रोजगार मिळालाच पाहिजे’ असा मजकूर लिहीलेला फलक घेऊन ते आंदोलनाला बसले. वारंवार सरकारकडे निवेदन देऊन, पाठपुरावा करूनही सरकार प्रश्न मार्गी लावत नाही. त्यामुळे आता उपोषणाचा निर्धार करीत असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले. त्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रोहित पवार यांनी आंदोलस्थळी प्रत्यक्ष भेट घेऊन आश्वासन दिले. लवकरात लवकर बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावला जाईल, असा विश्वास मंत्र्यांनी दिल्यामुळे उदय सामंत यांनी आंदोलन मागे घेतले आहे.
ही भूमिका योग्य नाही
पावसाळी अधिवेशनात अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन उचित निर्णय घेतला जाईल, असे सभागृहात सांगितले. मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी यासंदर्भातील पत्र दिल्यानंतर लोकप्रतिनिधींनी त्याची गंभीर दखल घ्यायला हवी. असे आंदोलनाला बसणे योग्य नाही, या शब्दांत अजित पवार यांनी रोहित यांना फटकारले. त्यावर उपमुख्यमंत्री म्हणून आपणच हा प्रश्न मार्गी लावला तर माझा मतदारसंघ आपला आभारी असेन, असे प्रत्युत्तर रोहित पवार यांनी दिले आहे.