नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिवंगत माजी मंत्री अर्जुन (ए टी) पवार यांचे नातू आणि विद्यमान आमदार नितीन पवार यांचे चिरंजीव ऋषिकेश आज विवाहबद्ध होत आहेत. गंगापूर रोडवरील बालाजी लॉन्समध्ये हा विवाह सोहळा संपन्न होत आहे. राजकीय तसेच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या विवाह सोहळ्याची चर्चा रंगली आहे.
हा विवाह सोहळा अनेक अर्थाने लक्षवेधी ठरला आहे. ऋषिकेश यांना मोठा राजकीय वारसा लाभला आहे. त्यांचे आजोबा अर्जुन (एटी) पवार यांनी राज्याचे मंत्रिपद भूषविले होते. पाणीदार नेते म्हणून कसमा पट्ट्यात त्यांची ओळख आहे. एटी पवार हे सलग ७ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र नितीन पवार हे आमदार आहेत.
पंचक्रोशीत चर्चा
आमदार नितीन पवार यांच्या पत्नी जयश्री यांनी नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविलेले आहे. म्हणजेच वडील विद्यमान आमदार आणि आई माजी जिप अध्यक्ष अशी चिरंजीव ऋषिकेश यांची कौटुंबिक पार्श्वभूमी आहे. या विवाह सोहळ्याची चर्चा पंचक्रोशीत रंगली आहे. या सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे बडे नेते उपस्थित राहणार आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, पालकमंत्री दादा भुसे, माजी पालकमंत्री छगन भुजबळ, आमदार दत्ता भारणे यांच्यासह राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत.
नववधू
ऋषिकेश यांचा विवाह उर्वी यांच्याशी होत आहे. उर्वी या सुद्धा राजकीय घराण्यातीलच आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य यशवंत गवळी यांच्या त्या पुतणी आहेत. यशवंत गवळी यांनी अभोणा गटाचे प्रतिनिधीत्व केले आहे. गंगापूर रोडवरील बालाजी लॉन्स येथे हा सोहळा सध्या सुरू आहे. त्यासाठी भव्य दिव्य स्टेज उभारण्यात आले आहे. हळदी समारंभ, मुख्य समारंभ यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. विवाह सोहळ्याला जवळपास चार हजार वऱ्हाडी हजेरी लावतील, असा अंदाज आहे. आज सायंकाळी गोरज मुहूर्तावर जोडपे विवाहबद्ध होणार आहेत. प्रमुख मान्यवरांबरोबच नाशिक शहरासह जिल्ह्यात अनेक घरी निमंत्रण पत्रिका पोहचविण्यात आल्या आहेत. पाचपानी पत्रिकेत नावांचा फारसा भरणा नाही अन् त्यातून बडेजावही करण्यात आलेला नाही.
बालाजी लॉन्स, गंगापूर रोड, नाशिक येथे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज मा.आ.श्री.नितीन अर्जुन पवार यांचे सुपुत्र चि.ऋषिकेश व श्री.दिगंबर गवळी यांची सुकन्या चि.सौ,कां.उर्वी यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून वधूवरांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी खासदार समीर भुजबळ, माजी मंत्री दत्तात्रय भरणे, अदिती तटकरे, आमदार दिलीप बनकर, आमदार नरेंद्र दराडे, आमदार किरण लहामगटे, आमदार संग्राम जगताप, आमदार रोहित पवार, जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
चर्चा डॉ. भारती पवार यांची
या सोहळ्यास केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ . भारती पवार या उपस्थित राहणार की नाही, याविषयी चर्चा सुरु आहे. नवरदेव असलेल्या ऋषीकेश यांच्या मंत्री डॉ. पवार या काकू आहेत. पवार कुटुंबात गेल्या निवडणुकीत मतभेद निर्माण झाले. डॉ. भारती पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्या. त्यानंतर आता त्यांना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्रीपद मिळाले आहे. वैचारिक आणि राजकीय मतभेत असले तरी या कौटुंबिक सोहळ्याला डॉ. भारती पवार या उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येते.
MLA Nitin Pawar Son Wedding Ceremony Today