मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि आमदार नितेश राणे यांना कुठल्याही क्षणी अटक होण्याची चिन्हे आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे आता पोलिस त्यांना अटक करणार आहेत.
शिवसैनिक संतोष परब हल्ल्याप्रकरणी अटकेची टांगती तलवार आहे. राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी धाव घेतली. अटकपूर्व जामिनासाठी बुधवारी दोन्ही बाजूच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. याप्रकरणी गुरुवारी निकाल दिला जाईल असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. आज न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली. मात्र, न्यायालयाने राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे राणे यांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
तणावाची स्थिती
राणे यांच्या अटक आणि जामीन अर्ज प्रकरणावरुन सिंधुदुर्ग व कणकवलीत तणावाची स्थिती आहे. भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. दोन्हीही कार्यकर्ते आमने सामने आले. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला आहे.
शिवसैनिकांनी फटाके फोडले
न्यायालयाने निकाल देताच शिवसैनिकांनी न्यायालयाबाहेर जल्लोष केला. तसेच, यावेळी काही शिवसैनिकांनी सोबत फटाकेही आणले होते. उत्साहात त्यांनी हे फटाकेही फोडले. त्यामुळे न्यायालय परिसरात मोठ्या आनंदाचे वातावरण आहे.