इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भाजपने आतापर्यंत ८ सरकारे पाडली आहेत आणि इतर ४ सरकार पाडण्याची त्यांची योजना आहे, असा गंभीर आरोप करीत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी एक खळबळजनक व्हिडिओ जारी केला आहे. याद्वारे त्यांनी पुन्हा एकदा भाजपला निशाण्यावर घेतले आहे. भाजपने आपल्या पक्षाच्या आमदारांना लाच दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
केसीआर यांनी अनेक गंभीर आरोप भारतीय जनता पक्षावर केले आहे. ते म्हणाले, “भारतीय जनता पक्षाच्या २४ लोकांची टीम वेगवेगळ्या राज्यांमध्ये आमदारांना आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढण्याचे आणि निवडून आलेल्या सरकारांवर बुलडोझर चालवण्याचे काम करत आहे. तेलंगणाच्या आमदारांना बेकायदेशीरपणे आपल्या पक्षात सामील करून घेण्याचे प्रकरण केवळ या राज्यापुरते मर्यादित नाही, तर इतर राज्यांमध्येही असे घडण्याची शक्यता आहे.”
तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) पक्षाचे चार आमदारांना समोर करत केसीआर यांनी भाजपवर त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. तसेच, यासंबंधी आपल्याकडे एक तासापेक्षा जास्त कॅमेरा फुटेज आहे, असा दावा केसीआर यांनी दावा केला आहे. पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी पाच मिनिटांचा व्हिडिओही दाखवला. हा व्हिडीओ मागील आठवड्यातील आहे. तेलंगणातील एका फार्महाऊसमधील हा व्हिडिओ असल्याचे समोर आले आहे. राज्यातील पोटनिवडणुकीपूर्वी या व्हिडिओने राजकीय वादळ निर्माण केले होते. आता या प्रकरणाने जोर पकडला असून राज्यातून हा राष्ट्रीय मुद्दा बनत असल्याचे दिसून येत आहे.
या व्हीडिओबाबत केसीआर म्हणाले की, हा व्हिडिओ पुरावा आहे की फार्महाऊसवर आमदारांना बेकायदेशीरपणे खरेदी करण्याचा प्रयत्न केला जात होता. व्हिडीओमध्ये अमित शहा यांचा २० वेळा तर पंतप्रधान मोदींचा तीनदा उल्लेख करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री केसीआर यांनी आरोप करूनही भाजप किंवा अन्य कोणत्याही पक्षाच्या नेत्याचा सहभाग असल्याचा आरोप अद्याप सिद्ध झालेला नाही.
व्हीडिओ सर्वोच्च न्यायालयात पाठवणार
न्यायव्यवस्थेला देश वाचवण्याचे आवाहन करत केसीआर म्हणाले की, विरोधी नेत्यांचे व्हिडिओ सर्वोच्च न्यायालयात पाठवणार आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेश, दिल्ली आणि राजस्थानमधील सरकार पाडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. तर भाजपने केसीआर यांनी केलेले आरोप नाकारले असून ते भाड्याने घेतलेल्या कलाकारांसोबत व्हिडिओ रेकॉर्डिंग करत आहेत, असे म्हटले आहे. केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी केसीआर यांच्यावर टीका करताना म्हटले की, फार्म हाऊस कुटुंबातील दहशतीची पातळी प्रतिबिंबित करते. केसीआर यांनी दोन दिवसांपूर्वी एका सभेत म्हणाले होते की, “दिल्लीतील काही दलाल तेलंगणाच्या स्वाभिमानाला आव्हान देण्यासाठी आले होते…ऑपरेशन लोटस.” केसीआर यांनी केलेल्या या गंभीर आरोपांमुळे भाजप विरुद्ध केसीआर लढत सुरु झाली आहे.
MLA Horse Trading BJP Politics Conspiracy Video