नाशिक – भाजपच्या नाशिक मध्य मतदारसंघाच्या विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांच्या कन्येचा विवाह सोहळा आज संपन्न झाला आहे. या विवाह सोहळ्याला विविध मान्यवरांनी हजेरी लावली आहे. सायली फरांदे आणि स्वप्निल दिघडे यांचा विवाह सोहळा अत्यंत दिमाखदार पद्धतीने संपन्न झाला आहे.
भाजपचे नेते सुहास फरांदे आणि त्यांच्या पत्नी व आमदार देवयानी फरांदे यांची कन्या सायली यांचा विवाह सोहळा त्र्यंबकरोडवरील ग्रेप काऊंटी रिसॉर्टमध्ये आज संपन्न झाला. सायली यांनी व्यवस्थापनातील पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. सायली यांचे पती स्वप्निल दिघडे यांचे बीसीएस आणि एमबीए असे शिक्षण झाले आहे. स्वप्निल यांचा मुंबईत अत्याधुनिक स्टुडिओ आहे. अनेक चित्रपटांचे व विविध प्रकारचे काम या स्टुडिओच्या माध्यमातून ते करीत असतात. सांगली येथील भाजपच्या नगरसेविका भारती दिघडे यांचे स्वप्निल हे चिरंजीव आहेत. भारती दिघडे या सलग पाचवेळा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. भारती यांचे पती हेमंत दिघडे हे सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत.
देवयानी फरांदे या नाशिक महापालिकेच्या उपमहापौर राहिल्या आहेत. तसेच, त्या सलग दोन वेळा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांचे पती सुहास हे निष्ठावान भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी आहेत. फरांदे दाम्पत्याने प्रदेश पातळीवर संघटनात्मक जबाबदारी सांभाळली आहे.
आजच्या विवाह समारंभाला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व पालकमंत्री छगन भुजबळ, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.