नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर व जिल्ह्यातील शैक्षणिक अनुशेष भरून काढण्यासह दर्जेदार व परिपूर्ण शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एम.के.डी. शैक्षणिक संस्थेमार्फत केजी ते पीजी पर्यंतचे अध्ययावत व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक संकुल सुरू केले जात आहे. नंदुरबार शहरालगत नवापूर नंदुरबार रस्त्यावर शिवण, वाघाळे फाटा स्थित संकुलात एम.के.डी. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला (पॉलिटेक्निक) मंजुरी मिळाली असून प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती आमदार किशोर दराडे यांनी दिली.
नाशिक जिल्ह्यातील येवला व एकलहरे येथे संस्थेचे भव्य दिव्य कॅम्पस असून जिल्ह्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात दराडे कुटुंबियांनी मोठे काम उभे केले आहे. यामुळे अनेक गोरगरीब व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना केजी टू पीजी पर्यंतच्या शैक्षणिक सुविधा मिळत असून उच्च गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन नोकरीचे स्वप्नही पूर्ण होत आहे. शिक्षक आमदार म्हणून काम करत असताना नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील अनेक जाणकारांनी या भागातही शैक्षणिक योगदान द्यावे व शिक्षण क्षेत्राततील अडचणी दूर करत सुविधा उपलब्ध कराव्या अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानुसार या भागातील आदिवासी बांधव तसेच गोरगरीब व सर्व स्तरातील जनतेच्या शैक्षणिक सेवेसाठी येथे एम.के.डी. शिक्षण संकुल कार्यान्वित केले जात असून दर्जेदार भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे.
नंदुरबार येथील एम.के.डी. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला मान्यता मिळाली असून त्यासाठीची प्रवेश प्रक्रियाही सुरू आहे. दहावीनंतरच्या तीन वर्षाच्या पॉलिटेक्निकसाठी या कॅम्पसमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजीनियरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, कंप्यूटर इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या शाखांना प्रवेश दिला जात असून सर्व शाखांची उपलब्ध जागा ६० विद्यार्थी इतकी आहे. अनुभवी प्राध्यापक, डिजिटल क्लासरूम, उत्कृष्ट कॅम्पस यासह शासन मान्यता मिळाली आहे. शिवाय कॅम्पस इंटरव्यूचे आयोजन करून रोजगार मिळवून देण्यासाठी देखील संस्था पुढाकार घेते.
शिक्षक आमदार म्हणून काम करत असताना मागील पाच वर्षात पाचही जिल्ह्यातील शिक्षकांचे सर्वांगीण प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच पातळीवर नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांपर्यंत बदलते शैक्षणिक प्रवाह घेऊन जाऊन त्यांना भविष्याचा वेध घेणाऱ्या शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस आमदार किशोर दराडे यांनी यावेळी व्यक्त केला.