इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आमदार बच्चू कडू यांच्या विधानाचे पडसाद आसामच्या विधानसभेत आज उमटले. कडू यांचे विधान वादग्रस्त असल्याचे सांगत विरोधकांनी विधानसभेत गदारोळ केला. राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांच्या अभिभाषणादरम्यान विरोधकांनी गोंधळ घातला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी सदस्यांनी उठून घोषणाबाजी केल्याने कटारिया यांना १५ मिनिटांत आपले भाषण संपवावे लागले. महाराष्ट्रातील आमदारावर काय कारवाई झाली, असा प्रश्न विरोधी सदस्यांना उपस्थित केला.
आमदार बच्चू कडू काय म्हणाले?
महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी भटक्या कुत्र्यांबाबत वक्तव्य केले. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे भटके कुत्रे आसाममध्ये पाठवण्यात यावे, असे वक्तव्य कडू यांनी विधिमंडळ सभागृहात केले होते.
कटारिया यांनी भाषण सुरू करताच काँग्रेसचे आमदार कमलाख्या डे पुरकायस्थ यांनी हा मुद्दा उपस्थित केला. अपक्ष आमदार अखिल गोगोई यांनीही हा मुद्दा राज्यपालांच्या अभिभाषणात समाविष्ट करावा, असे सांगितले. विरोधी पक्षाच्या आमदारांनी कामकाजात व्यत्यय आणल्याने कटारिया यांना आपले भाषण मध्यंतरी संपवावे लागले. कडू यांच्यावर कठोर कारवाई करावी, आतापर्यंत त्यांच्यावर काय कारवाई झाली, असे प्रश्न विरोधकांनी उपस्थित केले. तसेच, आसामच्या अस्मितेला ठेच पोहचणारी बाब सरकार कशी खपवून घेत आहे, असा सवालही विरोधकांनी विचारला.
MLA Bacchu Kadu Statement Assam Assembly Disrupts