नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या अडचणी वाढल्या आहेत. नाशिक जिल्हा न्यायालयाने कडू यांना २ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. नाशिक महापालिका आयुक्तांवर बच्चू कडू यांनी थेट हात उगारला होता. याची गंभीर दखल न्यायालयाने घेतली आहे.
काय आहे हा प्रकार
अपंगांच्या विविध मागण्यासंदर्भात २०१७ मध्ये नाशिक महापालिकेच्या बाहेर आंदोलन सुरू होते. त्याचवेळी या आंदोलनात बच्चू कडू हे सहभागी झाले होते. तत्कालिन मनपा आयुक्तांनी आंदोलकांना चर्चेसाठी बोलावले. या शिष्टमंडळात कडू हे सुद्धा होते. त्यावेळी आयुक्तांशी चर्चा करताना कडू यांनी महापालिका आयुक्तांना धमकावणे आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केला. कडू यांनी आयुक्तांवर हात उगारल्याने ही बाब राज्य पातळीवर चर्चेची ठरली. त्यानंतर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी कडू यांच्या विरोधात सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. याच गुन्ह्याचा खटला नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू होता. आयुक्तांवर हात उगारल्याप्रकरणी दोन वेगवेगळ्या प्रकरणात नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने कडू यांना २ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
याआधीही शिक्षा
आमदार बच्चू कडू यांना पहिल्यांदाच न्यायालयाकडून शिक्षा झालेली नाही. यापूर्वी अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार न्यायालयानेही त्यांना शिक्षा ठोठावली आहे. विशेष म्हणजे, शिक्षा सुनावली तेव्हा तत्कालीन जलसंपदा आणि शिक्षण राज्यमंत्री होते. कडू हे २०१४ मध्ये अचलपूर विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते. याच निवडणुकाबाबत एकाने तक्रार केली होती. या तक्रारीत कडू हे दोष आढळले. त्यामुळे कडू यांना न्यायालयाने दोन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा आणि २५ हजार रुपये दंड ठोठावला होता.
MLA Bacchu Kadu Nashik Court 2 Year Punishment