मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आपल्या मुलीला उच्च शिक्षण घेताना परीक्षेमध्ये ज्यादा गुण मिळाल्याच्या गैरप्रकार घडल्याने आपल्या राज्याच्या एका मुख्यमंत्र्याला राजीनामा देण्याची वेळ आली होती, हे आठवण्याचे कारण म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार सध्या विशेष चर्चेत आले आहेत. राज्यभरात गाजत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी घोटाळ्यामध्ये सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींचे नाव पुढे आले आहे. सत्तार यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
हिना कैसार अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख अशी दोन्ही मुलींची नावे आहेत. अब्दुल सत्तार यांनी याबाबत एक चित्रफीत जाहीर करून हा नाहक बदनाम करण्याचा प्रकार असून या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केली. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीमध्ये घोटाळा झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणात काही जणांना अटक देखील करण्यात आली आहे.
टीईटो घोटाळा प्रकरणाची ईडीकडून देखील समांतर चौकशी सुरू आहे. याच प्रकरणात आता शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आरोग्य सेवक भरती प्रकरणचा पुणे पोलिसांकडून तपास सुरू असतानाच दुसरीकडे टीईटी परीक्षेत देखील घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. हा घोटाळा परीक्षा घेणारे खासगी कंपन्यांचे संचालक, परीक्षा देणारे विद्यार्थी आणि परीक्षा परिषदेचे अधिकारी यांच्या संगनमताने झाल्याचे समोर आल्यानंतर यातील काही जणांना अटक देखील करण्यात आली आहे.
तसेच ही परीक्षा देणारे विद्यार्थी या प्रकरणात दोषी आढळले आहेत, त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. परीक्षेत गैरप्रकार केलेल्या संबंधित उमेदवारांची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली असून, त्यांना टीईटी परीक्षा देण्यास कायमस्वरुपी बंदी घालण्यात आली आहे. मात्र दरम्यान या प्रकरणी माजी मंत्री व आमदार अब्दुल सत्तार यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आमची चूक असेल तर माझ्या मुलींवर कारवाई करावी. पण चूक नसेल तर ज्यांनी हे सर्व आरोप केले आहेत, त्याला फासावर लटकवायला पाहिजे.
या आरोपांप्रकरणी मी चौकशीची मागणी करतो. अशा पद्धतीने कुणालाही बदनाम करण्याचे काम कोणीही करू नये. या प्रकरणी कुठलीही विचारपूस करायची असेल तर शिक्षणाधिकारी आहेत, उपसंचालक आहेत. त्यांच्या कार्यालयात आमच्या संस्थेच्या माध्यमातून एक कागदही गेला असेल दोन्ही मुलींच्या नावाने तर आम्ही नक्कीच जबाबदार राहू. पण चुकीची माहिती देऊन समाजात आणि राजकारणात बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी मीच करणार आहे, असेही अब्दुल सत्तार म्हणाले.
दरम्यान, यामध्ये आता आमदार अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याचे उघड झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या परीक्षा परिषदेकडून गैरप्रकारात अडकलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये तब्बल ७ हजार ८७४ विद्यार्थ्यांच्या नावांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली असून, त्यांना टीईटी परीक्षा देण्यास कायमस्वरूपी मनाई करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून टीईटी घोटाळा उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. हजारो शिक्षकांना कामावरून कमी करण्यात येणार आहे. ज्यांना नोकरी मिळालेली नाही, त्या उमेदवारांना पुन्हा कधीच टीईटी देता येणार नाही. यावर शिवसेनेच्या नेत्यांनी टीका केली असून, यावर योग्य चौकशी आणि कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर या यादीतील नावावर अब्दुल सत्तार यांची देखील प्रतिक्रिया आली आहे. टीईटीची ती यादी फेक आहे,असेही सत्तार म्हणाले आहेत.
MLA Abdul Sattar Daughter Name in TET Scam