विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
केंद्र सरकारकडून देशभरात स्मार्ट सिटी मिशन राबविले जात आहे. विविध संकल्पनांसाठी निधीही दिला जात आहे. मात्र, देशात कुठली स्मार्ट सिटी पहिल्या क्रमांकावर आहे आणि कुठल्या शहराने उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारे स्मार्ट सिटी मिशन, अमृत आणि प्रधानमंत्री आवास योजना-शहरी राबविल्या जातात. योजनांची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ जून २०१५ रोजी केली होती. त्यामुळे या परिवर्तनकारी योजनांचा सहावा वर्धापनदिन आज (२५ जून) साजरा होत आहे. त्यासाठी एका ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे.
शहरी पुनरुत्थानाचा दृष्टीकोन समोर ठेवून या तीन योजना सुरू करण्यात आल्या होत्या आणि भारताच्या लोकसंख्येत ४० % वाटा असलेल्या शहरात राहणाऱ्या लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या उद्देशाने त्यांची बहुस्तरीय रचना करण्यात आली होती.
या कार्यक्रमात केंद्रीय शहरी व्यवहार मंत्रालयाकडून हाती घेण्यात आलेल्या काही महत्त्वाच्या उपक्रमांना अधोरेखित करण्यात येईल. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील. केंद्रीय शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्र यांनी या कार्यक्रमासाठी केंद्र आणि राज्याच्या सर्व संबंधितांना निमंत्रित केलं आहे.
राष्ट्रीय शहरी व्यवहार संस्थेलाही याच दिवशी ४५ वर्षे पूर्ण होत आहेत. केंद्रीय शहरी व्यवहार मंत्रालयाची ही स्वायत्त संस्था असून तिला शहरीकरणाशी संबंधित संशोधन आणि वापर यातील तफावत दूर करण्याची जबाबदारी सोपवली आहे.
या सहाव्या वर्धापनदिन कार्यक्रमात इंडिया स्मार्ट सिटीज पुरस्कार स्पर्धा (ISAC) २०२० आणि क्लायमेट स्मार्ट सिटीज मूल्यमापन चौकट (CSCAF) चे निकाल जाहीर होणार आहेत.
डेटा मॅच्युरिटी ऍसेसमेंट फ्रेमवर्क (DMAF) आणि क्लायमेट स्मार्ट सिटीज ऍसेसमेंट (CSCAF) यांचे निकालही या कार्यक्रमात जाहीर करण्यात येणार आहेत.
तसेच इंडिया स्मार्ट सिटीज फेलोशिप अहवाल, तुलिप वार्षिक अहवाल आणि शहरी व्यवहार राष्ट्रीय संस्थेने तयार केलेल्या ज्ञान उत्पादनांचे देखील प्रकाशन केले जाणार आहे.