सायकल घेवून घराबाहेर पडलेला अल्पवयीन मुलगा बेपत्ता; अपहरण केल्याचा संशय
नाशिक : सायकल घेवून घराबाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलगा बेपत्ता असून त्याचे कुणीतरी अपहरण केल्याचा संशय कुटूंबियांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओमकार प्रमोद कडजेकर (१६ रा.भगवा चौक,चेहडी पंपीग जवळ) असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. ओमकार रविवारी (दि.२१) आपली सायकल घेवून घराबाहेर पडला तो अद्याप परतला नाही. कुणी तरी त्याचे अपहरण केल्याचा संशय कुटूंबियांनी व्यक्त केला असून याप्रकरणी वडिल प्रमोद कडजेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक परदेशी करीत आहेत.
शहरात तीन दुचाकी चोरीला
नाशिक : शहरात मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच असून नुकत्याच तीन दुचाकी चोरट्यांनी पळवून नेल्या. याप्रकरणी मुंबईनाका व उपनगर पोलीस ठाण्यात वाहन चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून भामट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. गणेशगाव ता. त्र्यंबकेश्वर येथील ज्ञानेश्वर लिलके हे शनिवारी (दि.२०) शहरात आले होते. त्र्यंबक नाका येथील बागड हॉस्पिटल येथे ते आजारी नातेवाईकास भेटण्यासाठी गेले असता हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये लावलेली त्यांची स्प्लेंडर एमएच १५ ई क्यू ७५७० चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक गांगुर्डे करीत आहेत. दुसरी घटना समतानगर भागात घडली. अर्जुन भिकाजी गवळी (रा.लोखंडे मळा,जेलरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गवळी यांची एमएच १५ एचए ३६२८ ही शाईन दुचाकी गेल्या शनिवारी (दि.१३) समता नगर येथील दिवे बंगल्यासमोर पार्क केलेली असतांना चोरट्यांनी पळवून नेली. तर पुनम समाधान शिंदे (रा.डीजीपीनगर,अंबडलिंकरोड) यांची व्हेस्पा एमएच १५ जेके ९२९५ मोपेड शनिवारी (दि.२०) सायंकाळच्या सुमारास वडनेररोडवरील म्हसोबा मंदिराजवळील प्रकाश गॅरेज येथे लावलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. दोन्ही गुह्यांप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार शेजवळ आणि सातभाई करीत आहेत.