नाशिक – सध्याची टोमॅटोची आवक बघता मोठ्या प्रमाणावर टोमॅटो पिकाचे उत्पादन झाले असून टोमॅटोची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने बाजारभाव पडले आहे. याची तात्काळ दखल घेत केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी पियुष गोयल व कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांच्याशी संपर्क साधत हे कोसळलेले बाजारभाव बघता टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत येऊ नये म्हणून त्वरित पत्रव्यवहार केला तथा फोन वर संभाषण केले. यावेळेस टोमॅटो निर्यातीवर कुठलेही बंधन नसून निर्यात खुली आहे असे संबंधित मंत्री महोदयांनी सांगितले. शेतकरी उत्पादकांनी घेतलेल्या टोमॅटो पिकाची उत्पादन खर्चा पेक्षा कमी विक्री होत असेल तर मार्केट इंटरवेनशन स्कीम (MIU) च्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत मिळू शकते. याच स्कीमच्या माध्यमातून राज्यसरकारने जर मागणी केली तर केंद्रसरकार ५० टक्के तोटा सहन करून शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी तयार असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले. आता यासाठी राज्यसरकारने त्वरित केंद्राकडे मागणी केल्यास केंद्र सरकार निश्चितच अडचणीत आलेल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यास मदत करेल. आता राज्य सरकारने त्वरित याची दखल घेऊन तशी मागणी केंद्र सरकारकडे करावी. टोमॅटोचे बाजारभाव कमी झाल्याची तात्काळ दखल केंद्रसरकारने घेतल्या बद्दल ना. डॉ.भारती पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल, कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांचे आभार मानले.