मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अवैध गौण खनिज वाहतूक रोखण्यासाठी तसेच उत्खननापासून वाहतुकीपर्यंतच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी सर्व प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी सांगितले.
गौण खनिज आणि त्यापासून तयार केलेल्या उपपदार्थांच्या वाहतुकीबाबतची बैठक आज महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार धैर्यशील माने, आमदार जयकुमार गोरे, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
श्री. विखे- पाटील म्हणाले की, अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक हा सातत्याने कळीचा मुद्दा ठरला आहे. अनेकदा उत्खननावर आळा घालणाऱ्या महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांवर हल्लेही झाले आहेत. वैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीसाठी ऑनलाईन प्रक्रिया आणल्यामुळे अवैध वाहतुकीला आळा बसणार असून वैध प्रक्रिया सुलभपणे राबविणे व त्याचे प्रभावी नियंत्रण करणे शक्य होणार आहे.
Minor mineral Excavation process online government