इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपल्या देशात बालविवाह हा कायद्याने गुन्हा ठरतो, तरीही अनेक राज्यांमध्ये बालविवाहाची प्रथा अद्यापही कायम आहे. विशेषत राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार सारख्या राज्यांमध्ये सर्रासपणे बालविवाह होतात. विशेष म्हणजे काही ठिकाणी त्या अल्पवयीन मुलींची इच्छा नसताना त्यांचे पालक पैशाच्या आमिषाने या मुलीचा विवाह लाऊन देतात, अशाच प्रकारची घटना बिहार मध्ये घडली असून यामुळे खळबळ उडाली आहे.
पाटणा जिल्ह्यातील मानेर भागात एका अल्पवयीन मुलीने वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्या मुलीला शालेय शिक्षण घ्यायचे असताना , मात्र वडील तिचे लग्न करण्यावर ठाम होते. मुलीने आपल्या इच्छेविरुद्ध लग्न केल्याचे पाहून तिने पोलीस ठाणे गाठून वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करून न्याय मिळवून देण्याची विनंती केली. नरहन्ना गावात १६ वर्षीय मुलीने वडिलांविरुद्ध मणेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
उत्तर प्रदेशामधून तिच्या इच्छेविरुद्ध लग्नासाठी काही नागरिकांना बोलावण्यात आल्याचे त्या किशोरवयीन मुलीचे म्हणणे आहे. तिला शिक्षण घ्यायचे आहे, पण कुटुंबीय लग्नाच्या आग्रहावर ठाम होते. तिचे शिक्षण शेरपूर येथील इंदलसिंग हायस्कूलमध्ये सुरू आहे. तसेच जीवधारा समाजसेवा केंद्र, लोदीपूर येथे व्यवसाय प्रशिक्षण घेत आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत ती घरी आली असताना वडील मांझी यांनी तिच्या इच्छेविरुद्ध लग्न करण्यासाठी काही जणांना घरी बोलावले.
यामध्ये एका महिलेसह सहा जणांचा समावेश होता. त्यांनी माझ्या वडिलांना दारू पाजली आणि पैशाचे आमिष दाखवून मुलीला पळवून नेण्यास सुरुवात केली. कशीबशी तिने शिक्षण संस्थेला याची माहिती दिली. संस्थेचे कर्मचारी आल्याने तिचे प्राण वाचले. त्यानंतर यूपीहून आलेले लोक गाडी घेऊन पळून गेले. यात मानवी तस्करीचीही चर्चा आहे. याबाबत पोलीस अधिकारी राजीव रंजन यांनी सांगितले की, याप्रकरणी कारवाई सुरू आहे.