मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांमध्ये अल्पवयीन मुली, तरूणी आणि महिला यांच्यावरील अत्याचार वाढले आहेत. माटुंगा येथील महिला आश्रमातील एका मानसिक स्थिती ठीक नसलेल्या १५ वर्षीय मुलीला नायर रुग्णालयात दाखल केले होते. परंतु कुणालाही काही न सांगता सदर मुलगी रुग्णालयातून निघून गेली. मात्र तिला बाहेरच्या जगात सुरक्षित ठिकाण सापडले नाही, त्यामुळे ती मुलगी पुढे विकृतांच्या जाळ्यात अडकली आणि दोघांनी तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी दोघा जणांविरोधात पोक्सो, लैगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, त्यांचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी माटुंगा येथील सदर महिला आश्रमातील ४५ वर्षीय केअर टेकर महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. डोंगरीच्या बाल कल्याण समितीकडून महिला आश्रमात दाखल केलेल्या १५ वर्षीय मुलीची मानसिक स्थिती बिघडल्याने तिला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर दि. २१ ऑक्टोबर रोजी ती सकाळी ९ वाजता रुग्णालयातून निघून गेली. सदर घटना समजताच रुग्णालयात खळबळ उडाली असून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून ती सीएसएमटी स्थानकाच्या दिशेने निघून जाताना दिसली. त्या ठिकाणी सोनू व राजेंद्र नावाच्या तरुणांनी या मुलीची मानसिक स्थिती ठीक नसल्याचा फायदा घेत तिला सोबत पळवून नेले.
आणखी भयानक गोष्ट म्हणजे सीएसएमटी परिसरातील एका लॉजवर नेऊन तिच्यावर लैगिंक अत्याचार केला. ही घटना समजत तेथून सुटका करत तरुणी पुन्हा परतताच हा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून असून पोलीस अधिक तपास करत आहेत.