बरेली (उत्तर प्रदेश) – फरीदपूर शहर परिसरात एका अल्पवयीन युवतीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिला चपलेने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून संताप व्यक्त करण्यात येत आहे. सदर आरोपींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी होत आहे.
पिडीत मुलीने पोलिसात तक्रार दिली होती की, एका युवकाने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केले, तसेच बळाचा वापर करून युवकाच्या साथीदारांनीही सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.
मुलीच्या म्हणण्यानुसार, शहरातील एका युवकाने तिला प्रेम जाळ्यामध्ये अडकवले आणि २ वर्षे तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिच्याकडून ६० हजार रुपयेही घेतले. त्यानंतर या मुलीने लग्न करण्यास सांगितले असता त्याने लग्नास नकार दिला.
दरम्यान, या प्रकरणाची त्याने फरीदपूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असता, त्या युवकासह अन्य लोकांनी पोलीसांशी संगनमत करून हे प्रकरण दडपले. यानंतर तिने पुन्हा पोलिसांत तक्रार दिली. हे समजताच तरूणाच्या साथीदारांनी तिच्या घरात घुसून पुन्हा बळावर तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नाही तर तिला चपलेने जाहीरपणे मारहाण केली. त्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
दरम्यान, पीडित मुलीने या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे केली असून न्यायासाठी विनवणी केली. तर प्रभारी निरीक्षक गीतेश कपिल यांचे म्हणणे आहे की, दोन्ही बाजूंनी तडजोड झाली आहे. पोलिसांना कोणतीही लेखी तक्रार मिळाली नाही, म्हणून या प्रकरणात गुन्हा दाखल केलेला नाही.