नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अल्पवयीन मुलीचा पाठलाग करीत तिचा रस्ता अडवून धमकावित विनयभंग करणे तरूणाला महागात पडले आहे. याप्रकरणी जिल्हा व सत्रन्यायालयाने तीन वर्ष सक्तमजूरीची शिक्षा सुनावली. ही घटना सन.२०१८ मध्ये शिवाजीनगर येथील दीपनगर भागात घडली होती. हा खटला विशेष जिल्हा व सत्र न्यायाधिश डी.डी.देशमुख यांच्या कोर्टात चालला.
शुभम अशोक जाधव (१९ रा.समतानगर,आगरटाकळी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अल्पवयीन पिडीता १९ जानेवारी २०१८ रोजी सायंकाळच्या सुमारास दिपनगर येथील ड्रिम रॉयल बिल्डींग जवळून रस्त्याने पायी जात असतांना ही घटना घडली होती. दुचाकीवर पाठलाग करीत आलेल्या आरोपीने मुलीचा वाट अडवून मी तुझ्यावर प्रेम करतो असे म्हणत विनयभंग केला होता. यावेळी त्याने नकार दिल्यास तसेच वाच्यता केल्यास अॅसिड टाकण्यासह कुटूबिंयांना जीवे मारण्याची धमकी दिली. भेदरलेल्या मुलीने घर गाठून आपबिती कथन केल्याने पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून उपनगर पोलिस ठाण्यात विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुह्याचा तपास सहाय्यक निरीक्षक एस.डी.टिळे यांनी करून पुराव्यानिशी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. सरकार तर्फे अॅड. दिपशिखा भिडे यांनी काम पाहिले. सरकार पक्षाच्या वतीने पाच साक्षीदार तपासण्यात आले असता न्यायालयाने फिर्यादी,साक्षिदार आणि पंच यांनी दिलेली साक्ष आणि सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे आरोपीस दोषी ठरवीत त्यास तीन वर्ष सक्तमजूरी आणि दंडाची शिक्षा सुनावली.
Minor Girl Molestation Court Hearing Custody
Nashik Crime