मलप्पुरम (केरळ) – एका अल्पवयीन गर्भवतीने व्हिडिओ पाहून एकट्यानेच आपली प्रसुती करीत बाळाला जन्म दिल्याचे कुणी सांगितले तर तुमचा विश्वास बसेल का, पण हे खरे आहे. विशेष म्हणजे, या मुलीने घरातील आई-वडिलांनाही याचा सुगावा लागू दिला नाही. अखेर नाट्यमयरित्या हा सर्व प्रकार उघड झाला आहे.
प्रियकराने वारंवार कथित बलात्कार केल्यानंतर गरोदर राहिलेल्या एका १७ वर्षीय मुलीने प्रसुतीच्या प्रचंड वेदना होत असताना रुग्णालयात दाखल होण्याऐवजी घरीच युट्यूब व्हिडिओ पाहून मुलाला जन्म दिला. आश्चर्याची बाब म्हणजे या संपूर्ण घटनेबाबत अल्पवयीन मुलीच्या अंध पालकांना माहिती नव्हती. घरी पालक हजर असताना मुलीच्या खोलीत बंद दाराआड ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी सांगितले की, या घटनेची कुटुंबातील सदस्य आणि शेजाऱ्यांना माहिती कळाल्यावर बाळाच्या जन्मानंतर आई आणि बाळाला मांजरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघेही निरोगी आहेत.
या प्रकरणानंतर बलात्काराचा आरोप असलेल्या २१ वर्षीय तरुणाला लैंगिक छळापासून संरक्षण कायदा ( पोस्को ) आणि भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (बलात्कार) अंतर्गत एफआयआर नोंदवून अटक करण्यात आली आहे. सदर प्रकरण हे मलप्पुरम जिल्ह्यातील कोट्टक्कल पोलीस ठाण्यांतर्गत घडले असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीसांच्या प्राथमिक तपासात असे दिसून आले की, प्रसूतीदरम्यान तिने बाहेरून कोणाचीही मदत घेतली नाही. या मुलीने दि. 20 ऑक्टोबर रोजी घरीच यूट्यूब पाहून बाळाला जन्म दिला आणि तिची नाळ कापली. दोन दिवसांनी जेव्हा मुलीच्या खोलीतून दृष्टिहीन पालकांना दि. 22 ऑक्टोबर रोजी लहान बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला तेव्हा या घटनेची माहिती मिळाली, असे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी आणखी सांगितले की, ही मुलगी 12 व्या वर्गात शिकते आणि तिने तिच्या दृष्टिहीन पालकांपासून गर्भधारणा लपवून ठेवली. सदर मुलगी आणि एका तरुणाचे काही काळापासून प्रेमसंबंध होते आणि मुलगी 18 वर्षांची झाल्यावर दोघेही लग्न करण्याचा विचार करत होते. परंतु आता मध्येच विपरीत घडल्याने मुलगी आणि तिच्या मुलाची काळजी कुटुंबीयांकडून केली जात आहे, परंतु ती मुलगी 17 वर्षांची असून सज्ञान असल्याने याला बलात्काराचे प्रकरण मानले जात नाही.