इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राजस्थानातील जोधपूर येथे असलेल्या एका प्रतिष्ठीत क्लबमध्ये अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. या क्लबच्या कर्मचाऱ्याने अल्पवयीन मुलीचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनविल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, या मुलीनेच या कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणी क्लबच्या संचालकासह कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोधपूरमध्ये एक हायप्रोफाईल क्लब आहे. या क्लबमध्ये आलेल्या एका अल्पवयीन मुलीच्या आंघोळीचा व्हिडिओ क्लबच्याच एका कर्मचाऱ्याने बनविण्याचा प्रयत्न केला. ही बाब या मुलीच्या लक्षात आली. तिने तत्काळ तो मोबाईल हिसकावून घेतला. एवढा सारा प्रकार घडूनही क्लबचे कर्मचारी आणि अधिकारी हे त्या कर्मचाऱ्याच्या बाजूने बोलू लागले. तसेच, त्या कर्मचाऱ्याचा मोबाईल परत करावा, असे त्यांनी सांगितले. अखेर सर्वांचा दबाव असल्याने त्या मुलीने तो मोबाईल त्या कर्मचाऱ्याला परत केला.
या सर्व प्रकाराचा या मुलीवर एवढा परिणाम झाला की, ती घरी परतल्यानंतरही तिचे जेवणही बंद झाले. ती शांत राहत होती. तिच्या आई-वडिलांनी विचारपूस केली असता तिने सर्व घटना कथन केली. त्यानंतर आई-वडिलांनी तातडीने पोलिस स्टेशनमध्ये येऊन तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी क्लबमध्ये जाऊन चौकशी केली आणि क्लबच्या ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आरोपी कर्मचाऱ्याला अटक केली जाण्याची शक्यता आहे.