भोपाळ (मध्य प्रदेश) – सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना तारतम्य बाळगले पाहिजे, म्हणजेच भान ठेवून बोलणे आवश्यक असते. परंतु काही राजकीय नेते मात्र अशा प्रकारचे कोणतेही तारतम्य न बाळगता बेभान होऊन वक्तव्य करतात. आणि नंतर त्यांचे ते वक्तव्य वादग्रस्त ठरते. अशा प्रकारचे वक्तव्य करणारे भारतातील अनेक राज्यांमध्ये काही नेते आहेत.
आता मध्यप्रदेशातील मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहाण यांच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने असे एका समाजाच्या संबंधित वादग्रस्त वक्तव्य केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री बिसाहुलाल सिंग हे एका कार्यक्रमात महिलांच्या हक्कांवर बोलताना म्हणाले की, “समाजात समानता राहावी यासाठी ठाकूर समाजाच्या घरातील महिलांना काम करण्यासाठी घराबाहेर काढले दिले पाहिजे. कारण की , हे मोठे लोक त्यांच्या घरातील सर्व महिलांना घरातच खोलीत बंद करतात. सर्व मोठे ठाकूर, ठाकर व इतर उच्चवर्णीय समाज आपल्या महिलांना कोठडीत कोंडून ठेवतात. तर आमच्या गावातील स्त्रिया ही सर्व कामे करतात, भात कापण्याचे, अंगण झाकणे, शेण फेकण्याचे काम त्या करतात. महिला आणि पुरुषांना समान अधिकार आहेत, तर दोघांनीही समानतेने काम केले पाहिजे. प्रत्येकाने आपले हक्क ओळखून पुरुषांच्या बरोबरीने काम केले पाहिजे आणि वरिष्ठ समाजाच्या महिला घराबाहेर येत नसतील तर त्यांना धरून बाहेर काढा, तरच महिला पुढे जातील”, असे सिंग म्हणाले.
आता त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या व्हिडिओमुळे महिलांच्या हक्क विषयक चर्चेला उधाण आले. यासोबतच बिशाहूलाल यांच्या वक्तव्याचा वादही अधिकच वाढला आहे. सोशल मीडियावरील काही वापरकर्त्यांचा असा विश्वास आहे की, त्यांचा हेतू योग्य असू शकतो परंतु वक्तव्य योग्य नाही, तर काहींनी हा सर्व माहिलांचा आणि ठाकूरांचा अपमान असल्याचे म्हटले आहे. तसेच पुनीत अरोरा नावाचा मोबाईल अॅप वापरकर्ता लिहितो की, बिशाहुलाल यांच्या विधानावरून वाद निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही त्यांनी काँग्रेस नेत्याच्या पत्नीवर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती, या दाव्यासह आरोरा यांनी स्थानिक वृत प्रसिद्ध केले आहे.